मुक्तपीठ टीम
देशामागोमाग राज्यातही भाजपा सत्तेवर आल्यानंतर २०१५पासून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यामागे लागलेल्या घोटाळ्याच्या आरोपातून मुंबई सत्र न्यायालयाने त्यांना दोषमुक्त केले आहे. भुजबळांनी आनंद व्यक्त करतानाच लोक मला अजूनही शांत झोपू देणार नाहीत, अशी व्यक्त केलेली भीती खरी ठरू शकतेय. या प्रकरणात सुरुवातीपासूनच लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्यांच्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेण्याचा इशारा दिलाय. त्यांनी मांडलेले मुद्दे हे भुजबळांसाठी अडचणीचे ठरू शकतात. निर्दोष सोडणाऱ्या निकालाची प्रत हाती येताच त्या उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याने भुजबळांसाठी पुढचा काळही टेन्शनचाच असण्याची शक्यता आहे.
भुजबळांना दिलासा देणारा गुरुवार
- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणातून मुक्तता झाली आहे.
- मुंबई सत्र न्यायालयाने भुजबळांना निर्दोष मुक्त केले आहे.
- भुजबळांना हा मोठा दिलासा मिळाल्यानंतर त्यांनी ‘सत्य परेशान होता है पराजित नहीं,’ अशी प्रतिक्रिया दिली.
- कोणाबद्दल द्वेष नाही, कोणावर लोभ नाही.
- आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे.
- आज दु:खाचा पाढा वाचणार नाही, काही लोक अजूनही मला शांतपणे झोपू देणार नाहीत!
छगन भुजबळ, पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांना Session’s court कडून महाराष्ट्र सदन केस मधून डिस्चार्ज मिळाला आहे. ह्या डिस्चार्ज ला मी हाय कोर्टात चॅलेंज करणार आहे
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) September 9, 2021
महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणाच्या आरोपातून छगन भुजबळ मुक्त झाले आहेत. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरण हे सर्वानाच परिचयाचे आहे. “महाराष्ट्र सदन हे एका फाईव्ह स्टार हॉटेल सारखं बांधलं गेलं आहे आणि त्याचा वापर अनेक राजकीय पक्ष करत आहेत. कंत्राटदाराला १ फूट जमीन किंवा एफएसआय मिळालेला नाही आहे. ८०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. जनतेच्या आशीर्वादामुळेच मी दोषमुक्त झालो.” असे ते म्हणाले.
दोषमुक्तीनंतर भुजबळ काय बोलले?
१. आजचा दिवस आनंद साजरा करण्याचा आहे. ज्यांना हायकोर्टात यायचं आहे त्यांनी खुशाल जावं.
२. २ वर्षापेक्षा अधिक काळ समीर आणि मला तुरुंगात राहावे लागले.या केसमधून आम्हाला वगळण्यात यावं कारण आमचा काही दोष नाही हे कोर्टाच्या निदर्शनास आणण्यात आले.
३. ईडीची कारवाई यावरच आधारित आहे.
४. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मी आभारी आहे, की त्यांनी मला लगेच मंत्रिमंडळात घेतले.
५. मला गप्प करण्यासाठी प्रयत्न केला गेला.
६. समाधानाची झोप लागेल, पण अनेकजण मला झोपू देणार नाहीत.
पंकज भुजबळ, समीर भुजबळ आणि इतरांनी, तळोजा च्या एका केस मध्ये दाखल केलेले discharge petition कोर्टाने allow केले. पण सरकारी वकील गैरहजर होते? का? मग केस ची बाजू कोण मांडणार? सगळ्या केसेस अशा एक एक डिस्चार्ज मिळत जाणार?
सरकार आपली बाजू न मांडता? pic.twitter.com/Aix81eGAxO
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) September 9, 2021
भुजबळ विरुद्ध दमानिया पुन्हा सामना रंगणार
अंजली दमानिया यांनी भुजबळांवर अनेक आरोप केले आणि चौकशी करण्यासही सांगितले. यावर प्रतिउत्तर देत भुजबळ म्हणाले की, “ज्यांना हायकोर्टात जायचं आहे त्यांनी खुशाल जावं.” मुंबई सत्र न्यायालयाने दिलेल्या या निर्णयानंतर अंजली दमानिया यांनी एक ट्विट केलं आहे. अंजली दमानिया यांनी ट्विट करत हायकोर्टात दाद मागणार असल्याचं म्हटलं आहे.
अंजली दमानियांचे भुजबळांच्या सुटकेबद्दलचे आक्षेप
- भुजबळांविरोधात २०१६मध्ये आरोपपत्र दाखल झाले.
- जर कुणी निर्दोष असेल तर तो दोषमुक्ततेसाठी लगेच न्यायालयात जातो, भुजबळांनी तसे केले नाही.
- भाजपाचे सरकार गेले. शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचे २०१९मध्ये सरकार आले.
- सत्तेवर आल्यानंतर भुजबळांच्या पक्षाच्या म्हणजे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे गृह मंत्रालय आणि पर्यायाने तपास यंत्रणा म्हणजे लाच लुचपत प्रतिबंधक शाखा आहे.
- त्यानंतर छगन भुजबळ यांनी सत्र न्यायालयात दोषमुक्तीचा अर्ज दाखल केला.
- त्यामुळे साहजिककच त्यांना दोषमुक्त होण्यासाठी कोणते मुद्दे फायद्याचे ठरले ते तपासावे लागतील.
- माननीय न्यायालयाने दिलेल्या निकालाचा अभ्यास करुन उच्च न्यायालयात दाद मागितली जाईल.
पंकज, समीरच्या प्रकरणाच सरकारी वकीलच नव्हता, दमानियांचा आक्षेप
- सकाळीच अंजली दमानिया यांनी पंकज आणि समीर प्रकरणाविषयी एक ट्वीट केले होते.
- त्यात त्यांनी मांडलेला सरकारी वकील गैरहजर राहण्याचा मुद्दा गंभीर आहे.
- “पंकज भुजबळ, समीर भुजबळ आणि इतरांनी, तळोजा च्या एका केस मध्ये दाखल केलेला दोषमुक्त अर्ज कोर्टाने स्वीकारले.
- पण सरकारी वकील गैरहजर होते? का? मग केस ची बाजू कोण मांडणार? सगळ्या केसेस अशा एक एक डिस्चार्ज मिळत जाणार? सरकार आपली बाजू न मांडता?”
छगन भुजबळांचं काय म्हणणं?
- “साजिशे लाखो बनती हैं मेरी हस्ती मिटाने के लिए, ये जनता की दुवाऐं है उन्हे मुक्कमल नहीं होने देती. असा शायराना अंदाज दिसून आला.
- कोर्टाच्या निर्णयानंतर ताबडतोब पवारांना भेटणं महत्त्वाचं होतं, आता शांत झोप लागेल.
- तुरुंगात जावं लागल्याचं दु:ख आहे, पण किती वेळ दु:ख उगाळत बसायचं, माझ्या मनात कुणाबद्दलही व्देष नाही आहे.
- आमचे सरकार असल्यामुळे माझी सुटका झाली असं नाही आहे.
दोषमुक्तीला आव्हानाबद्दल कायदा काय सांगतो?
- सत्र न्यायालयाच्या निकालाचा अभ्यास करून त्यातील मुद्द्यांच्या आधारे अंजली दमानिया वरील न्यायालयात दाद मागू शकतात.
- खरंतर अशा प्रकरणात दोषमुक्तीविरोधात सरकारनेच वरील न्यायालयात दोषमुक्तीला आव्हान देणे आवश्यक असते.
- परंतु सध्या भुजबळांचा पक्ष भाग असलेली आघाडी सत्तेवर आहे. त्यांच्या पक्षाकडेच गृहखाते आहे.
- त्यामुळे सरकारकडून आव्हान दिले जाणे शक्य दिसत नाही. त्यासाठी आधीच्या सरकारने राजकीय सूडबुद्धीने कारवाई केली होती, असा बचाव वापरला जाऊ शकतो.
- पण सरकार जरी गेले नाही तरी खासगी व्यक्तीही अशा प्रकरणातील निकालाला वरील न्यायालयात आव्हान देऊ शकते, त्यासाठी पुनर्विचार याचिकेचा पर्याय उपलब्ध असतो.
- फौजदारी दंड संहितेत तसा पर्याय उपलब्ध आहे. कलम ३९७ नुसार तशी याचिका दाखल करता येते, अशी माहिती सर्वोच्च न्यायालयातील वकील (अॅडव्होकेट ऑन रेकॉर्ड) अॅड. अनिता बाफना यांनी दिली.
- त्यानुसार न्यायालयात आपले म्हणणे मांडून पुन्हा दमानिया पुनर्विचाराची मागणी करु शकतात.