मुक्तपीठ टीम
गेली काही वर्षे संकटांनी घेरल्या गेलेले उद्योगपती अनिल अंबानी यांच्यावर कर्जाचेही मोठे ओझे आहे. त्यांच्याविषयी येणाऱ्या बातम्या या नकारात्मकच असतात. पण याच प्रतिकुलतेत त्यांची एक कंपनी मात्र दिलासा देणारी सकारात्मक कामगिरी बजावत आहे.
उद्योगपती अनिल अंबानी यांच्यासाठी हे वर्ष आव्हानांनी भरलेले आहे. यावर्षी अनिल अंबानीच्या अनेक बड्या कंपन्यांची विक्री प्रक्रिया पूर्ण होणार आहे, यामुळे अनिल धिरुभाई अंबानी रिलायन्स समूहाचे कर्जही कमी होण्याची अपेक्षा आहे.
रिलायन्स कॅपिटलसह अनिल अंबानीच्या बहुतांश कंपन्या तोट्यात गेल्या आहेत, परंतु रिलायन्स पॉवर फायद्यात आली आहे. रिलायन्स पॉवरने नुकत्याच जाहीर केलेल्या निकालात दिलेल्या माहितीनुसार चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत सुमारे ५३ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. नफ्यात सुमारे ६% वाढ आहे. वर्षभरापूर्वी याच तिमाहीत रिलायन्स पॉवरला ४९ कोटी रुपयांचा नफा झाला होता.
रिलायन्स पॉवरचे उत्पन्न डिसेंबरच्या तिमाहीत २,००६ कोटी रुपयांवर गेले आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीत कंपनीला १,८९८ कोटी रुपये मिळाले. सध्या कंपनीचे बाजार भांडवल १,३१५.६० रुपये आहे.