मुक्तपीठ टीम
‘फक्त मराठी वाहिनी’ने प्रेक्षकांच्या आवडीचे चित्रपट, कार्यक्रम, मालिकांद्वारे ‘अभिमान भाषेचा वारसा कलेचा’ म्हणत मनोरंजनाची परंपरा अखंडित जपली आहे. वाहिनीने पाककलेवरील ‘अंगत पंगत’ या खास खवय्यांसाठी खुमासदार आणि कुरकुरीत अश्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. संपूर्ण कुटुंबाने एकत्रित, गप्पा मारत आपल्या आवडीच्या पदार्थांची निर्मिती, त्यांचा इतिहास, तसेच एकाच घटक पदार्थापासून महाराष्ट्रातील ग्रामीण, शहरी व विश्वात तयार होणारा पदार्थ कोणता याची रंजक रेसिपी पहायला मिळणार आहे. सर्वांना तृप्त करणाऱ्या वेगवेगळ्या पाककला १९ एप्रिल पासून सोमवार ते शुक्रवार दररोज दुपारी १:३० वाजता, ‘फक्त मराठी वाहिनी’वर पाहायला मिळणार आहे.
‘अंगत पंगत’ या शो मध्ये तीन वेगवेगळ्या प्रकारच्या, वेगवेगळ्या पद्धतीच्या रेसिपीज प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत. या शोचं वैशिष्ट्य म्हणजे, या तिन्ही रेसिपी एकाच घटक पदार्थापासून तयार केल्या जाणार आहेत. यात पहिला विभाग – वदनी कवळ, अर्थात देशी, आपल्या मातीतले पदार्थ असतील. दुसरा विभाग – मिक्स मेजवानी, अर्थात फ्यूजन रेसिपीचा आणि तिसरा विभाग – सातासमुद्रापार यात साता – समुद्राबाहेरील पदार्थांची ओळख होणार आहे.
“माणसाच्या मनात शिरण्याचा मार्ग पोटातून जातो असं म्हणतात. एखाद्या माणसाला खाण्यातून जिंकलं तर मनातून जिंकणं फार कठीण नसतं. खाण्याच्या पद्धतीतून खाणाऱ्याचे आणि खाऊ घालणाऱ्याचे संस्कार दिसतात. दर बारा कोसावर भाषा बदलते तसेच खाद्य संस्कृतीही बदलते. मराठी पदार्थांनी जगातील खवैयांनां वेड लावलेले आहे. महाराष्ट्राची ही खाद्यसंस्कृती केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात आपलं वेगळेपण टिकवून आहे. आपल्या पदार्थांमधील हीच विविधता ‘अंगत पंगत’ या विशेष कार्यक्रमात प्रेक्षकांसाठी वेगळेपण असेल”,असे ‘फक्त मराठी वाहिनी’चे बिझनेस हेड श्याम मळेकर म्हणाले.
‘अंगत पंगत’ या शोचं आणखी एक वैशिष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे एक्सिक्युटीव्ह शेफ शंतनू गुप्ते. भारतीय पदार्त्यांसोबतच मॉडर्न युरोपियन फाइन डायनिंगमध्ये ते विशेष निपुण आहेत. Institute of Hotel Management मधून पदवी घेतल्यानंतर त्यांनी युरोपमधील नॉर्थ नॉर्वे विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतले आहे. गेली अठरा – एकोणीस वर्षे त्यांनी भारतासह युरोपमधील विविध पंचतारांकित रेस्तराँमध्ये शेफ म्हणून आपली सेवा दिली आहे. त्यांच्या चवींना जगभरातील खवय्यांनी पसंती दिली आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोकप्रिय अभिनेत्री सायली देवधर करीत आहे. तिचे खुमासदार सूत्रसंचालन अधिकच रुचकर असल्याने शो पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी ती मेजवानीच ठरणार आहे.
‘अंगत पंगत’ची विशेष बाब म्हणजे या शो मध्ये दर शुक्रवारी आपल्या आवडत्या सेलिब्रेटींच्या आवडीचे पदार्थ ते करून दाखविणार आहेत. प्रसिद्ध अभिनेते संजय मोने, संदीप पाठक, स्नेहा रायकर, दीप्ती भागवत, सप्तपदी या मालिकेची नायिका तृप्ती देवरे असे अनेक लोकप्रिय कलाकार आपले आवडते पदार्थ बनवताना दिसतील आणि त्यासोबत आपल्या प्रवासाविषयी आणि आठवणी विषयी सवांद साधतील. “महाराष्ट्रातला माणूस हा खवय्या आहे., त्याला वेगवेगळे पदार्थ खायला आणि खाऊ घालायला खूप आवडतात. आपली अशी एक खाद्यसंस्कृती सुद्धा आहे जी पूर्वापार चालत आली आहे आणि ती संस्कृती महाराष्ट्रातच नव्हे तर जगभर प्रसिद्ध आहे आणि हाच आपल्या खाद्य संस्कृतीचा ठेवा “अंगत पंगत” ह्या कार्यक्रमाद्वारे आम्ही प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहोत. हा कार्यक्रम त्याच्या वेगळेपणामुळे खवय्यांची मन जिंकण्यात नक्कीच यशस्वी होईल असा विश्वास फक्त मराठीचे वरिष्ठ कार्यकारी निर्माते संकेत पावसे यांना वाटतोय.
‘अंगत पंगत’ या शोची निर्मिती निर्माते निखिल रायबोले, भुपेंद्रकुमार नंदन यांच्या ‘कॅफे मराठी’ या संस्थेनी केली असून दिग्दर्शन हेमंत तांबे यांचे आहे. प्रसिद्ध गीतकार श्रीरंग गोडबोले यांची या शो चे शीर्षक गीत लिहिले असून संगीतकार रोहित नागभिडे यांनी ते संगीतबद्ध केले आहे. ‘अंगत पंगत’ शोचं लेखन अभिजित पेंढारकर यांचं असून छायांकन – नरेश राम शिवगन यांनी केले आहे. या शोची आकर्षक सजावट कलादिग्दर्शिका तृप्ती ताम्हाणे यांनी केले असून संकलन मनीष शिर्के, सिद्धेश हडकर याचे आहे. या शो साठी फक्त मराठी वाहिनीचे वरिष्ठ कार्यकारी निर्माता संकेत पावसे तर बिझनेस हेड शाम मळेकर आहेत. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ शंतनू गुप्ते प्रेक्षकांना नवनव्या महाराष्ट्रातील तसेच जगप्रसिद्ध पदार्थ करून दाखविणार असून त्यांना बोलत करीत त्या पदार्थांचा इतिहास अभिनेत्री सायली देवधर तिच्या बहारदार निवेदनातून उलगडणार आहे. सर्वांना तृप्त करणाऱ्या महाराष्ट्रासह जगभरातील समृद्ध रेसिपी सोमवार ते शुक्रवार दररोज दुपारी १:३० वाजता, आपल्या ‘फक्त मराठी वाहिनी’वर ‘अंगत पंगत’ मध्ये नक्की पहा.