मुक्तपीठ टीम
अणदूर आणि नळदुर्ग या दोन गावांत चार किलोमीटर अंतर असून, दोन्ही ठिकाणी श्री खंडोबाचे मंदिरे आहेत पण मूर्ती मात्र एकच आहे, श्री खंडोबा देवाचे वास्तव्य वर्षातील सव्वा दहा महिने अणदूर येथे आणि पावणे दोन महिने नळदुर्ग मध्ये असते.
अणदूरहुन नळदुर्गला आणि नळदुर्गहुन अणदूरला मूर्ती नेताना दोन्हीं गावातील मानकऱ्यामध्ये देवाचा लेखी करार केला जातो, तोही मूर्तीच्या समोर भंडारा उधळून …
अणदूरची यात्रा रविवारी मोठया भक्तीभावाने पार पडली, यावेळी मधतरात्री 1 वाजता दोन्ही गावाच्या मानकऱ्यात लेखी करार करून त्याचे वाचन करण्यात आले त्यानंतर श्री खंडोबाची मूर्ती पालखीमध्ये वाजत गाजत नळदुर्गला नेण्यात आली, सोमवारी पहाटे पाच वाजता नळदुर्गच्या मंदिरात श्री खंडोबा, म्हाळसा, हेगडीप्रधान यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
अणदूर खंडोबाचं जागृत देवस्थान!
अणदूर – नळदुर्ग ( मैलारपूर ) येथील श्री खंडोबा हे जागृत देवस्थान असून, श्री खंडोबा – बाणाई विवाहस्थळामुळे राज्यात प्रसिद्ध आहे. श्री खंडोबाच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश . तेलंगणा येथील हजारो भाविक दर्शनासाठी दरवर्षी येत असतात.
श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टचं काम कसं चालतं?
तुळजापूर तालुक्यातील अणदूर – नळदुर्ग ( मैलारपूर ) येथील श्री खंडोबा देवस्थानाचं काम एका ट्रस्टच्या माध्यमातून चालतं. या ट्रस्टच्या अध्यक्षपदी बालाजी मोकाशे, उपाध्यक्षपदी अविनाश मोकाशे यांची नव्याने तर सचिवपदी सुनील ढेपे यांची फेरनिवड नुकतीचकरण्यात आली आहे.
१० वर्षानंतर श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी बदलेले आहेत. सचिव सुनील ढेपे वगळता अन्य आठ सदस्य नवीन घेण्यात आले आहेत. मावळते अध्यक्ष प्रकाश मोकाशे यांनी नव्या पदाधिकाऱ्याकडे कार्यभार सोपवला. नवीन पदाधिकारी असे : अध्यक्ष – बालाजी सुधाकर मोकाशे , उपाध्यक्ष – अविनाश दिलीप मोकाशे , सचिव – सुनील मधुकर ढेपे, सदस्य- महेश विठ्ठल मोकाशे, शशिकांत यादव मोकाशे , दिपक अशोक मोकाशे ,महादेव गंगाधर मोकाशे , अमोल रमेश मोकाशे , सदानंद खंडेराव येळकोटे.