मुक्तपीठ टीम
‘एनएसई’ को-लोकेशन प्रकरणी झालेल्या गैरव्यवहारात सीबीआयने आनंद सुब्रमण्यम यांना चेन्नई येथून अटक केली आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी ही माहिती दिली. सीबीआयने त्यांच्या चेन्नई येथील निवासस्थानावर छापा टाकला होता. आनंद हेच एनएसईच्या सीईओ चित्रा रामकृष्ण यांच्या निर्णयांची सूत्रं हलवणारे रहस्यमय बाबा असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हिमालयातील एका अज्ञात योगी बाबाच्या सांगण्याप्रमाणे चित्रा रामकृष्ण देशाच्या राष्ट्रीय शेअर बाजार चालवत असत, असा आरोप आहे. आनंद आणि त्यांच्या पत्नीला फारसा अनुभव नसताना कोट्यवधीच्या पॅकेजवर एनएसईच्या सेवेत घेतल्यापासून कुजुबुज सुरु झाली होती. सीबीआयने आनंद सुब्रम्हण्यम यांची तीन दिवस चौकशी केली आहे, लवकरच तोच बाबा आहे की आणखी इतर कुणी ते स्पष्ट होईल.
बाजार नियामक सेबीच्या म्हणण्यानुसार, आनंदची पत्नी सुनीता १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१४ दरम्यान स्टॉक एक्सचेंजच्या चेन्नई कार्यालयात सल्लागार म्हणून रुजू झाली होती. त्यावेळी त्यांचा पगार ६० लाख रुपये ठरला होता. त्याच दिवशी आनंद यांची मुख्य धोरणात्मक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि त्यांचा पगार १.६८ कोटी रुपये होता.
एनएसई को-लोकेशन घोटाळ्याच्या संदर्भात ही अटक करण्यात आल्याचे सीबीआय अधिकाऱ्यांनी सांगितले. एनएसईमध्ये काही वर्षांपूर्वी झालेल्या या घोटाळ्यातील ही आतापर्यंतची पहिली अटक आहे. गुरुवारी रात्री आनंद सुब्रमण्यम यांना त्यांच्या चेन्नईतील घरातून अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना दिल्लीतील सीबीआय मुख्यालयात नेण्याची तयारी सुरू असून, त्यानंतर त्यांना कोठडीसाठी न्यायालयात हजर केले जाईल.
अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, याचिका मंजूर झाल्यानंतर, सीबीआय त्यांना राष्ट्रीय राजधानीत आणेल आणि त्याच्या मुख्यालयातील विशेष न्यायालयात हजर करेल आणि या प्रकरणाशी संबंधित चौकशीसाठी त्यांना कोठडीत रिमांडवर घेऊन जाईल.
‘एनएसई’ को-लोकेशन प्रकरण काय?
- ‘एनएसई’कडून सह-स्थान (को-लोकेशन) सुविधेअंतर्गत, त्यांच्या दलाल सदस्यांना संगणकीय सव्र्हर हे बाजाराच्या डेटा सेंटरमध्ये ठेवण्याची सवलत आहे.
- या सुविधेमुळे या दलाल सदस्यांकडून होणाऱ्या नोंद व्यवहारांना जलद अॅक्सेस मिळतो तसेच, त्यांच्या खरेदी-विक्री व्यवहारांची अंमलबजावणी शीघ्रगतीने होण्यास मदत होते.
- या सुविधेसाठी एनएसई सदस्यांकडून अतिरिक्त शुल्कही वसूल केले जाते.
- मात्र जुलै २०१६मध्ये त्रयस्थ संस्थेकडून केल्या गेलेल्या न्यायवैद्यक तपासणीत या सुविधेत काहीतरी संशयास्पद असल्याचे ‘सेबी’च्या ध्यानात आले.
- यात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे पुढे तपासात आढळून आले.
रामकृष्ण यांना ३ कोटींचा दंड
- या प्रकरणी सेबीने रामकृष्ण यांना ३ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
- याशिवाय सेबीने एनएसईला २ कोटी रुपये, एनएसईचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ रवी नारायण यांना २ कोटी रुपये आणि मुख्य नियामक अधिकारी आणि अनुपालन अधिकारी व्ही आर नरसिंहन यांना ६ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.