मुक्तपीठ टीम
निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांचे “जीवनमान सुलभ” करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. सरकारच्या निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतनधारक कल्याण विभागाने त्यासाठी डिजिटलायझेशनवर भर दिला आहे. निवृत्ती वेतन धोरण तसेच निवृत्तीवेतन संबंधित प्रक्रियांचे डिजिटलायझेशन करण्यासाठी अनेक कल्याणकारी उपाय योजले आहेत.
अमृतसर येथे आयोजित दोन दिवसीय बँकर्स जागरूकता कार्यक्रमाचे उद्घाटन भारत सरकारच्या निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतनधारक कल्याण विभागाचे सचिव व्ही. श्रीनिवास यांच्या हस्ते करण्यात आले. निवृत्ती वेतनधारकांना विनाअडथळा सेवा देण्यावर व्ही श्रीनिवास यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात भर दिला. या दृष्टीने हा विभाग, एआय/एमएल आधारित एकात्मिक निवृत्ती वेतनधारक पोर्टल विकसित करणार आहे. निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतनधारक कल्याण पोर्टलमुळे निवृत्तीवेतनधारक, सरकार आणि बँकर यांच्यात विनाअडथळा संवाद सुनिश्चित करण्यात येईल. त्यासाठी चॅट बॉटची निर्मिती यांसारख्या उपाययोजनांवर हा विभाग कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.
निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतनधारक कल्याण विभाग पीएनबी तसेच इतर बँकांच्या सहकार्याने ही डिजीटल प्रणाली तयार करण्यासाठी एका तंत्रज्ञान चमूची स्थापना करत आहे, असे श्रीनिवास यांनी सांगितले. प्रक्रिया आणि लोकांशी संबंधित तक्रारींवर पीएनबीच्या माध्यमातून अत्यंत काटेकोरपणे लक्ष दिले जाते . २०१४ मध्ये हयातीचा दाखला डिजिटल देण्याची सुरुवात करण्यात आली. हा दाखला आधारकार्डवर आधारित बायो-मेट्रिक उपकरणे, इंडियन पोस्ट पेमेंट्स बँकेचे १ लाख ९० हजार ग्रामीण डाक सेवक आणि बँकांद्वारे (डोअरस्टेप बँकिंग) घरापर्यंत बँकिंग सेवेद्वारे उपलब्ध होत आहे. फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञान नोव्हेंबर २०२१ मध्ये सुरु करण्यात आले. हे तंत्रज्ञान निवृत्ती वेतनधारकांचा हयातीचा दाखला सादर करण्याच्या पद्धतीत बदल घडवून आणणारे आहे. फिनटेकचा मोठ्या प्रमाणावर वापर केल्यास निवृत्ती वेतनधारकांच्या जीवनमानात सुधारणा होईल, असे श्रीनिवास यांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या निवृत्ती वेतनधारकांना निवृत्तीवेतन वितरणाबाबत विविध नियम आणि प्रक्रियांसंदर्भात जागरूकता निर्माण करणे तसेच धोरण आणि कार्यपद्धतींमधील विविध सुधारणांद्वारे वेळोवेळी होणाऱ्या बदलांबद्दल विभागीय पदाधिकाऱ्यांना अद्ययावत करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. बँक अधिकाऱ्यांना या प्रक्रिया हाताळताना येणाऱ्या समस्या आणि निवृत्ती वेतनधारकांच्या तक्रारी समजून घेणे हा देखील या कार्यक्रमाचा उद्देश आहे. असे जनजागृती कार्यक्रम बँक अधिकारी आणि निवृत्तीवेतनधारक /कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरतील अशी अपेक्षा आहे.