मुक्तपीठ टीम
गेल्या काही दिवसांपासून तज्ञांकडून जानेवारीच्या 15 तारखेच्या सुमारास कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आणि ओमायक्रॉनचा धोका वाढण्याची शक्यता वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर लातूर प्रशासनाने आवश्यक ती तयारी पूर्ण करावी असे वैद्यकीय शिक्षण तथा सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.
वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली लातूर जिल्ह्याची आढावा बैठक ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. यावेळी लातूरचे जिल्हाधिकारी बी.पी. पृथ्वीराज, लातूरचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, लातूर महापालिका आयुक्त अमन मित्तल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.वडगावे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, आदी उपस्थित होते.
शासनाच्या निर्बंधाचे पालन करावे
वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख म्हणाले की, राज्य शासनाने रविवारी म्हणजेच 9 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून अनेक निर्बंध राज्यात लावले आहेत. कोविडपासून बचाव करण्यासाठी राज्य शासनाने जारी केलेले नियम आपण सर्वांनीच पाळणे आवश्यक आहे. गेल्या दोन वर्षांपासून आपण कोविड-19 या संसर्गाशी मुकाबला करीत असताना आता कोविडची तिसरी लाट येण्याची शक्यता दिसत असल्याने आवश्यक त्या वैद्यकीय उपाययोजना जिल्हा प्रशासनाने पूर्ण कराव्यात. कोविडच्या तिसऱ्या लाटेचा धोका सौम्य असेल असे भाकीत तज्ञांकडून करण्यात येत असले तरी आपण सर्वांनीच आवश्यक ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.
जिल्हा प्रशासनाने लसीकरणावर भर द्यावा
सतत मास्कचा वापर, सॅनिटायझर वापरण्याची सवय आणि सुरक्षित अंतर याचे पालन आपण सर्वांनीच करणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासनाने अधिकाधिक लसीकरण मोहिमेवर भर देण्याबरोबरच फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना, आरोग्य सेवक, 60 वर्षावरील आणि सहव्याधीग्रस्त असणाऱ्यांना प्राधान्याने प्रतिबंधात्मक मात्रा देण्याचे नियोजन करावे. याशिवाय 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचा लसीचा पहिला डोस पूर्ण करण्यावर भर द्यावा.तिसऱ्या लाटेमध्ये रुग्णांची संख्या वाढू शकते हे लक्षात घेऊन येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाने आवश्यक त्या उपाययोजना पूर्ण कराव्यात. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुगणालयाच्या अधिष्ठातांनी पुढील काही दिवस अधिक सजग राहून कोणताही निष्काळजीपणा होणार नाही याची काळजी घ्यावी. महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये आवश्यक त्या सोईसुविधा, ऑक्सिजनची उपलब्धता, व्हेंटिलेटर्सची संख्या यांच्यासह तांत्रिक साहित्य तयार ठेवावे.
या बैठकीत वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी लातूर येथील शासकीय रुग्णालय आणि महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधा, ऑक्सिजनचा साठा, उपलब्ध असलेल्या व्हेंटिलेटर्सची संख्या, औषधांची उपलब्धता, रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी उपाययोजना, गरज पडल्यास अतिरिक्त डॉक्टर्सची उपलब्धता अशा विविध विषयांचा आढावा घेतला. लातूरचे जिल्हाधिकरी पृथ्वीराज बी.पी. यांनी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून जिल्हा प्रशासनाने केलेल्या तयारीबाबतची माहिती या बैठकीदरम्यान दिली.