मुक्तपीठ टीम
नागपूर कामठी येथील सरकारी रुग्णालय- वैद्यकीय महाविद्यालय उभारणीचा ७५ टक्के खर्च सामाजिक न्याय खात्याच्या माथी मारण्याच्या विरोधात आणि दलित विकासाचा निधी अन्य ठिकाणी वापरण्यास प्रतिबंध करणारा कायदा त्वरित करण्यात यावा, या मागणीसाठी आंबेडकरी संग्रामचे स्वाक्षरी अभियान येत्या ६ डिसेंम्बरपासून सुरू होणार आहे. त्यादिवशी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन असून चैत्यभूमीवरच त्या अभियानाचा प्रारंभ करण्यात येणार आहे. त्याचे पडसाद विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात उमटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
या अभियानाची घोषणा आज संविधान दिन साजरा होत असताना आंबेडकरी संग्रामचे अध्यक्ष प्रा डॉ जी के डोंगरगावकर आणि सरचिटणीस ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे. महापरिनिर्वाण दिनानंतर दलितांच्या वस्त्यांमध्ये जावून या अभियानाद्वारे सरकारच्या निर्णयाविरोधात जनमताचा रेटा उभा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई, उल्हासनगर, अंबरनाथ येथील दलित वस्त्यांमध्ये स्वतः फिरून आंबेडकरी संग्रामचे पदाधिकारी -कार्यकर्ते स्वाक्षरी अभियान राबवणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
महाविकास आघाडी सरकारने ६ ऑक्टोबर २०२१ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सामाजिक न्याय खात्याचे तब्बल ८७५ कोटी रुपय नागपूर कामठी येथील नियोजित सरकारी रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयासाठी वळवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याविरोधात अनुसूचित जातींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्याची वेळीच दखल घेऊन विधिमंडळ अधिवेशनाआधी राज्य सरकारने तो निर्णय मागे घ्यावा. तसेच सामाजिक न्याय खात्याच्या निधीच्या रक्षणासाठी आंध्र,कर्नाटकाच्या धर्तीवर कायदा करण्यासाठी पावले उचलावीत, अशी आंबेडकरी संग्रामची मागणी आहे.
१४ हजार कोटी पळवले; हंडोरे यांचीही कबुली
राज्यातील अनुसूचित जातींच्या विकासासाठी संविधानिक अधिकारानुसार लोकसंख्येच्या प्रमाणात निधीची तरतूद केली जाते. मात्र प्रत्यक्षात देय असलेल्या निधीपेक्षा कमी निधी दिला जात असतानाच सामाजिक न्याय खात्याच्या अपुऱ्या निधींवरही नंतर डल्ला मारला जातो, असे प्रा डोंगरगावकर पुढे म्हणाले की, गेल्या 20 वर्षांत दलितांच्या विकासाला बाजूला सारत सामाजिक न्याय खात्याचे 14 हजार कोटी रुपये अन्य कामांकडे वळवण्यात आलेत, याची कबुली काँग्रेसचे माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी अलीकडेच नागपूर येथे दिली आहे.