मुक्तपीठ टीम
अॅमेझॉनचे जेफ बेझोस नेहमीच वेगळ्या कल्पनांवर व्यवसाय विस्ताराच्या प्रयत्नात असतात. सध्या त्यांची एक भन्नाट कल्पना प्रत्यक्षात येताना दिसतेय. ही कल्पना आहे, अंतराळवीरांप्रमाणेच जो पैसा देऊ शकेल त्यांना अंतराळ पर्यटनासाठी नेण्याची.
जेफ बेझोस यांची कंपनी ब्लू ओरिजिन त्यासाठी प्रयत्न करीत आहे. ही कंपनी २० जुलैपासून प्रवाशांना अंतराळ पर्यटनासाठी घेऊन जाण्याच्या तयारीत आहे. कंपनीने त्यांच्या यानात उपलब्ध सहा जागांचा लिलाव सुरू केला आहे. अंतराळ पर्यटन यात्रेसाठीच्या जागांची ऑनलाईन लिलाव प्रक्रिया पाच आठवड्यांपर्यंत चालणार आहे. या लिलावात मिळालेला पैसा ब्लू ओरिजिन फाउंडेशनकडे जाईल.
ब्लू ओरिजिनचे नवीन स्पीयर्ड रॉकेट कॅप्सूल पृथ्वीपासून १०० मैलांवर सहा प्रवाशांना नेण्यासाठी डिझाइन केलेले आहे. एवढ्या उंचीवर काही मिनिटांपर्यंत भारहीनता जाणवते. अंतराळातून पृथ्वीचं दर्शन घेतलं जाऊ शकतं. या कॅप्सूलमध्ये सहा निरीक्षण खिडक्या आहेत. ही कॅप्सूल बोईंग ७४७ विमानापेक्षा जवळपास तीन पट मोठे असेल.
ब्लू ओरिजिनचे संचालक एरियन कॉर्नेल यांच्या म्हणण्यानुसार, या कॅप्सूलची विंडो प्रवाशांना पृथ्वी आणि अवकाश पाहण्याचा उत्कृष्ट अनुभव देईल. जुलैच्या या उड्डाणानंतर कंपनी हे अंतराळ पर्यटन पुढेही सुरू ठेवेल. कॉर्नेल यांनी तिकिटाच्या वास्तविक मूल्याबद्दल माहिती उघड केलेली नाही. तरीही अंतराळ पर्यटकांना सुमारे दीड कोटी रुपये द्यावे लागतील, अशी शक्यता आहे.