मुक्तपीठ टीम
प्रजासत्ताक दिनापूर्वी देशात मोठा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या पन्नास वर्षांपासून इंडिया गेटवर ज्वलित असलेली ‘अमर जवान ज्योती’ राष्ट्रीय युद्ध स्मारकातील ज्योतीत विलीन होणार आहे. इंडिया गेटवरील अमर जवान ज्योत शुक्रवारी एका समारंभात राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या ज्योतीमध्ये विलीन केली जात आहे. या सोहळ्याचे अध्यक्ष एअर मार्शल बलभद्र राधा कृष्ण असतील. त्यांच्याहस्तेच ज्योत विलीन केली जाईल. त्यामुळे आता अमर जवान ज्योत ही राष्ट्रीय युद्ध स्मारकात तेवताना दिसेल.
राष्ट्रीय युद्ध स्मारकात २६ हजारांहून जास्त शहीद सैनिकांची नावं…
- राष्ट्रीय यु्द्ध स्मारक इंडिया गेटजवळ ४० एकरपेक्षा अधिक जागेत बांधण्यात आलं आहे.
- स्वातंत्र्य भारतासाठी शहीद झालेल्या २६ हजारांहून अधिक भारतीय सैनिकांच्या नावांची नोंद आहे.
- तेथे राष्ट्रीय युद्ध संग्रहालयही आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९मध्ये राष्ट्रीय युद्ध स्मारकाचं उद्घाटन केलं होतं.
- शुक्रवारी दुपारी होणाऱ्या कार्यक्रमामध्ये प्रज्वलित ज्योतीचा काही भाग इंडिया गेटपासून राष्ट्रीय युद्ध स्मारकापर्यंत घेऊन जाण्यात येणार आहे.
- तेथे तेवणाऱ्या ज्योतीत ही ज्योत विलीन होईल.
- त्यानंतर इंडिया गेटवरील ज्योत विझवली जाईल.
अमर जवान ज्योतीची १९७१मध्ये झाली स्थापना
- इंडिया गेट येथील अमर जवान ज्योत सर्व जवानांच्या आणि सैनिकांच्या सन्मानासाठी एक स्मारक आहे.
- १९७१ मध्ये भारत आणि पाक युद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या स्मरणार्थ अमर जवान ज्योतीची स्थापना करण्यात आली.
- या युद्धात भारताचा विजय झाला आणि बांगलादेशची निर्मिती झाली.
- २६ जानेवारी १९७२ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या ज्योतीचे उद्घाटन केले होते.
२०१९मध्ये राष्ट्रीय युद्ध स्मारकाचे उद्घाटन
- नरेंद्र मोदी सरकारने इंडिया गेट कॉम्प्लेक्समध्ये राष्ट्रीय युद्ध स्मारक बांधले आणि २०१९ मध्ये त्याचे उद्घाटन झाले.
- युद्ध स्मारक बांधल्यानंतर, सर्व लष्करी समारंभ तेथे आयोजित होऊ लागले आहेत.
- राष्ट्रीय युद्ध स्मारकमध्ये सर्व भारतीय संरक्षण कर्मचार्यांची नावे आहेत, ज्यांनी १९४७-४८ च्या पाकिस्तानसोबतच्या युद्धापासून ते चिनी सैन्यासोबतच्या गलवान खोऱ्यातील संघर्षापर्यंत विविध मोहिमांमध्ये आपले प्राण गमावले.
- स्मारकाच्या भिंतींवर दहशतवादविरोधी मोहिमांमध्ये प्राणार्पण केलेल्या सैनिकांची नावेही आहेत.