मुक्तपीठ टीम
रेल्वे गाड्यांमध्ये दिल्या जाणाऱ्या खान-पान सेवेत सुधारणा करण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने आयआरसीटीसी अर्थात भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळाला मेन्यू अर्थात अन्नपदार्थांच्या यादीतील पदार्थ ठरविण्याबाबत लवचिकता प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रादेशिक पातळीवरील वैशिष्ट्य असणारे अथवा प्राधान्य दिले जाणारे खाद्यपदार्थ, वेगवेगळ्या ऋतुंमध्ये बनविल्या जाणाऱ्या पाककृती, सणासुदीच्या काळात मागणी असणारे पदार्थ तसेच मधुमेही प्रवासी, लहान बाळे यांच्यासारख्या विशिष्ट प्रकारच्या गटांतील प्रवाशांना आवश्यक असलेले खाद्यपदार्थ, भरड धान्यांवर आधारित स्थानिक खाद्यपदार्थांसारखे आरोग्यदायी खाद्यान्न पर्याय या सर्वांचा समावेश रेल्वे गाड्यांमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणात व्हावा या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, सक्षम अधिकाऱ्यांना खालील बाबतीत मंजुरी देण्याचे अधिकार दिले आहेत:
१. प्रीपेड प्रकारच्या गाड्यांच्या तिकिटांमध्ये प्रवास शुल्कासोबत खानपान सेवेचे शुल्क देखील समाविष्ट असते, अशा वेळी आधी सूचित केलेल्या शुल्कामध्ये दिले जाणारे अन्नपदार्थ आयआरसीटीसी निश्चित करेल. त्याचबरोबर, या प्रीपेड प्रकारच्या गाड्यांमध्ये स्वतंत्रपणे मागविल्या जाणाऱ्या जेवणाची तसेच एमअरपी अर्थात कमाल किरकोळ किंमतीसह ब्रँडेड पदार्थांची विक्री करण्यास देखील परवानगी असेल. मात्र, स्वतंत्रपणे मागविल्या जाणाऱ्या जेवणातील पदार्थ आणि त्याचे शुल्क आयअरसीटीसीद्वारे निश्चित करण्यात येईल.
२. इतर मेल किंवा एक्प्रेस गाड्यांमध्ये आधी सूचित केलेल्या ठराविक शुल्कामध्ये दिल्या जाणाऱ्या प्रमाणित जेवण थाळीसारख्या मर्यादित खर्चाच्या मेन्यूची निवड आयआरसीटीसीद्वारे केली जाईल. जनता गाड्यांमधील जेवणाचे पदार्थ आणि शुल्क यांच्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
- मेल आणि एक्सप्रेस प्रकारच्या गाड्यांमध्ये स्वतंत्रपणे मागविल्या जाणाऱ्या जेवणाची तसेच एमअरपी अर्थात कमाल किरकोळ किंमतीसह ब्रँडेड पदार्थांची विक्री करण्यास देखील परवानगी असेल. अशा प्रकारच्या जेवणाचे पदार्थ आणि शुल्क आयअरसीटीसीतर्फे निश्चित करण्यात येईल.
३. पदार्थसूची ठरविताना आयअरसीटीसी खालील बाबींची सुनिश्चिती करून घेईल:
- प्रवाशांच्या तक्रारी टाळण्यासाठी, गाड्यांमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवण तसेच सेवांचा दर्जा आणि प्रमाणके यांच्यात सुधारणा करत राहणे आणि दर्जा तसेच प्रमाणात तडजोड करण्यासारखे सततचे आणि अयोग्य बदल करावे लागू नयेत म्हणून सुरक्षिततेचे नियम निश्चित करणे
- निश्चित करण्यात आलेले पदार्थ शुल्काशी सुसंगत असावेत आणि प्रवाशांच्या माहितीसाठी पदार्थांविषयी पूर्वकल्पना देण्यात यावी तसेच नवे पदार्थप्रकार अमलात आणण्यापूर्वी रेल्वे विभागाला त्याची माहिती दिलेली असावी असा सल्ला देण्यात आला आहे.