डॉ. राहुल पंडित
कोरोना साथीविरोधातील आपल्या लढ्याला आणखी एक शस्त्र देण्यासाठी भारत सरकारने २-डिऑक्झी-डी-ग्लुकोज (२-डीजी) नावाचे एक प्रभावी कोविडविरोधी औषध आणले आहे. इन्स्टिट्यूट ऑफ न्युक्लीयर मेडिसिन अँड अलाइड सायन्सेस (आयएनएमएएस) या संरक्षण संशोधन व विकास संस्था अर्थात डीआरडीओच्या प्रयोगशाळेने हैदराबादच्या डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजच्या सहयोगाने हे औषध विकसित केले आहे. मध्यम ते तीव्र स्वरूपाचा कोरोना झालेल्या रुग्णांमध्ये आपत्कालीन स्थितीत अनुयोगी (अॅडजंक्ट) उपचार म्हणून या औषधाचा उपयोग करण्यास भारतीय औषध महानियंत्रकांनी (डीसीजीआय) या महिन्याच्या सुरुवातीला मंजुरी दिली आहे.
२-डिऑक्झी-डी-ग्लुकोज (२-डीजी) नेमके काय आहे?
२-डिऑक्झी-डी-ग्लुकोज या औषधाच्या चाचण्या कॅन्सरवर उपचाराच्या दृष्टीने पूर्वीपासून सुरू आहेत पण आत्तापर्यंत या औषधाला मंजुरी मिळालेली नव्हती. मात्र, कोरोना आजारावर हे औषध प्रभावी ठरत असल्याचे दिसून आले. हे औषध पावडर स्वरूपात सॅशेमध्ये उपलब्ध होते आणि ही पावडर पाण्यात विरघळवून तोंडावाटे रुग्णाला दिली जाते. विषाणू-प्रभावीत पेशींमध्ये हे औषध साचते आणि व्हायरल सिंथेसिस (विषाणू संश्लेषण) व ऊर्जा निर्मिती थांबवून विषाणूच्या वाढीला आळा घालते. प्रादुर्भावित पेशींमध्येच साचून राहण्याच्या वैशिष्ट्यामुळे हे औषध अनन्यसाधारण ठरते. डीआरडीओमधील न्युक्लीयर मेडिसिन अँड अलाइड सायन्सेस (आयएनएमएएस) ही लॅब हैदराबाद येथील डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजच्या (डीआरएल) सहयोगाने, कॅन्सरवरील रेडिएशन थेरपीसंदर्भात, या औषधाचा अभ्यास करत आहे.
या औषधाच्या मूलभूत यंत्रणेमध्ये ग्लायकोसिस प्रतिबंधित करण्याचा किंवा पेशी ऊर्जानिर्मितीसाठी ग्लुकोजचे विभाजन करण्यासाठी जे मार्ग वापरतात त्यापैकी एखादा मार्ग प्रतिबंधित करण्याचा समावेश होतो. कॅन्सरच्या पेशींद्वारे होणारी ऊर्जानिर्मिती थांबवून त्यांना नष्ट करण्यासाठी वापरली जाणारी ही पद्धत प्रतिकृती र्निमितीसाठी ग्लायकोसिसवर अवलंबून असलेल्या विषाणूग्रस्त पेशींबाबतही वापरली जाऊ शकते. भारतात कोविड साथीचा उद्रेक झाला तेव्हा, डीआरडीओची आयएनएमएएस आणि डीआरएल यांनी हे औषध कोरोना बरा करण्यासाठी वापरले जाऊ शकते का याची शक्यता तपासून बघण्यावर लक्ष केंद्रित केले. हैदराबाद येथील सेंटर फॉर सेल्युलर अँड मोलेक्युलर बायोलॉजीमध्ये गेल्या वर्षी झालेल्या चाचण्यांत असे आढळून आले की, हे औषध विषाणूग्रस्त पेशींना नष्ट करत आहे. त्यानंतरच्या टप्प्यात प्रत्यक्ष लोकांवर याच्या चाचण्या घेण्यात आल्या.
२-डिऑक्झी-डी-ग्लुकोज औषधाची क्लिनिकल ट्रायल
क्लिनिकल पुरावा व परिणामकारकतेविषयी माहिती गोळा करणे. एप्रिल २०२० मध्ये, आयएनएमएएसने सेंटर फॉर सेल्युलर अँड मोलेक्युलर बायोलॉजीच्या (सीसीएमबी) मदतीने हैदराबादमध्ये प्रायोगिक परीक्षण सुरू केले. त्यानंतर मे २०२० मध्ये, सेंट्रल ड्रग स्टॅण्डर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ) आणि भारतीय औषध महानियंत्रक (डीसीजीआय) यांनी संयुक्तपणे फेज-२ चाचण्यांसाठी, परवानगी दिली. मे ते ऑक्टोबर २०२० या काळात कोरोना रुग्ण या औषधाला कसा प्रतिसाद देत आहेत याच्या प्रारंभिक चाचण्या इन्स्टिट्यूटने सुरू केल्या. या औषधाचा उत्तम परिणाम दिसून आला, कोणतेही साइड-इफेक्ट्स दिसून आले नाहीत आणि रुग्ण जलदगतीने बरे झाले. त्यानंतर नोव्हेंबर २०२० ते मार्च २०२१ या काळात दिल्ली, उत्तरप्रदेश, बंगाल, गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश, तमिळनाडू आणि कर्नाटकात चाचण्या घेण्यात आल्या. या चाचण्यांतून अनुकूल निष्पत्ती प्राप्त झाली.
परिणामकारकतेचा मुद्दा: क्लिनिकल ट्रायल्सच्या निष्पत्तीतून असे दिसून आले की, रुग्णालयात दाखल झालेले रुग्ण जलदगतीने बरे होण्यात हा रेणू उपयुक्त ठरतो तसेच यामुळे रुग्णाचे पूरक ऑक्सिजनवरील अवलंबित्वही कमी होते. कोरोना बाधित झालेल्या रुग्णांसाठी हे औषध खूपच गुणकारी ठरेल असे यातून स्पष्ट झाले. परिणामकारकतेबद्दलच्या क्लिनिकल डेटानुसार, २-डीजी औषध देण्यात आलेल्या रुग्णांमधील आजाराची लक्षणे, विविध एण्डपॉइंट्सवर, स्टॅण्डर्ड ऑफ केअरच्या (एसओसी) तुलनेत जलदगतीने नाहीशी झाली. एसओसीच्या तुलनेत हे औषध दिलेल्या बहुसंख्य रुग्णांची (४२ टक्के विरुद्ध ३१ टक्के) लक्षणे वेगाने कमी झाली आणि तिसऱ्या दिवसापर्यंत हे रुग्ण पूरक ऑक्सिजनवरील अवलंबित्वापासून मुक्त झाले. याचा अर्थ हे औषध ऑक्सिजन थेरपीची गरज किंवा त्यावरील अवलंबित्व जलदगतीने कमी करत आहे.
जबाबदारीने वापर
आपला देश कोरोनाच्या विध्वंसक ठरलेल्या दुसऱ्या लाटेचा परिणाम कमी करण्यासाठी झगडत असतानाच या औषधाला मंजुरी मिळून ते उपलब्ध झाले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आपली संरचना व संसाधने यांच्यावर प्रचंड ताण आलेला आहे, या दोन्ही बाबी कमाल मर्यादेपर्यंत ताणल्या गेल्या आहेत. मी याकडे कोरोनावर उपचार करण्यासाठी आमच्या हातात असलेले आणखी एक औषध म्हणून पाहत आहे. अर्थात हे औषध खबरदारी पाळून घेतले जाणे अत्यावश्यक आहे. कोरोना आजारावरील कोणतेही औषध डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय घेतले जाऊ नये. याशिवाय औषधाचा साठा करून ठेवणे हा गुन्हा आहे. या औषधाची ज्यांना गरज आहे, त्यांना ते उपलब्ध झाले पाहिजे याची काळजी देशाचे जबाबदार नागरिक म्हणून आपण घेतलीच पाहिजे.
(डॉ. राहुल पंडित, संचालक- क्रिटिकल केअर, फोर्टिस हॉस्पिटल्स, मुंबई तसेच महाराष्ट्राच्या कोरोना टास्कफोर्सचे सदस्य)