मुक्तपीठ टीम
उत्तर प्रदेशात नव्या वर्षात फेब्रुवारीत विधानसभा निवडणुका आहेत. तिथं सत्ताधारी भाजपाविरोधात राजकीय आणि सामाजिक समीकरणे जुळवत समाजवादी पार्टी जोरदार तयारी करत आहे. नेमकं त्याचवेळी आयकर विभाग म्हणजे आयटीने समाजवादी पार्टीचे काही नेते तसेच अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या निकटवर्तीयांवर धाडी सुरु केल्या आहेत. त्यावर बोलताना अखिलेश यादव यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाचा पराभव टाळण्यासाठी दिल्लीतून मोठे नेते येतात. आता आयकर विभाग आले, मग ईडी आणि सीबीआय येणार. उत्तर प्रदेशात निवडणूक लढवण्यासाठी आयकर विभागही आला आहे. भाजपकडे नवीन काहीच नाही.
सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पत्रकार परिषदेत भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. सपाचे प्रवक्ते राजीव राय यांच्या जागेवर टाकण्यात आलेल्या छाप्यावर अखिलेश यादव म्हणाले की, सर्व काही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केले जात आहे. इन्कम टॅक्स रिटर्न भरताना का दिसले नाही? याला पक्ष आणि नेते घाबरत नाहीत. भारतीय जनता पक्ष काँग्रेसच्या वाटेवर चालत आहे.काँग्रेसचा जुना इतिहास बघा, ज्यावेळी धमकावलं तेव्हा या संस्थांचा वापर धमकावण्यासाठी केला गेला.अखिलेश यादव म्हणाले की, भाजपा आम्ही रामराज्य आणू असं म्हणत होती. पण समाजवादाचा मार्ग रामराज्य आणेल.
खरंतर, आयकर विभागाच्या पथकाने शनिवारी सकाळी माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे जवळचे मित्र आणि सपा नेत्यांच्या लखनौ, मैनपुरी, मऊ येथील घरे आणि कॅम्प ऑफिसवर छापे टाकले. मैनपुरीचे मनोज यादव, लखनौमधील माजी मुख्यमंत्र्यांचे ओएसडी जैनेंद्र यादव आणि मऊचे राजीव राय यांच्यासह डझनहून अधिक नेते सामील आहेत. आंबेडकर पार्कजवळील जैनेंद्र यादव यांच्या घरावर आयकर छापा पडला आहे. दुसरीकडे, मऊ येथील सपा नेते राजीव राय यांच्या कॅम्प ऑफिसवर छापा टाकण्यात आला. छाप्याची माहिती मिळताच डझनभर कामगार घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी गोंधळ घातला. गदारोळ वाढण्याची भीती असल्याने मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी मागवण्यात आला आहे.