मुक्तपीठ टीम
मराठा आरक्षणासाठी घटनात्मक तरतुदींचे कारण पुढे जात असेल तर त्यात बदल करण्यासाठी दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करण्याचं आवाहन माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केले आहे. केंद्र सरकारनं एकतर मराठा समाजाला हक्काचं आरक्षण द्यावं किंवा मग संपूर्ण देशालाच आरक्षणमुक्त करावं, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यासाठी येत्या नऊ ऑगस्टला दिल्लीत ते आंदोलनाचे रणशिंग फुंकणार आहेत.
माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या निवेदनाचा काही भाग:
जय शिवराय,
मित्रानो आपण मराठा आरक्षणासाठी गेले ४१ वर्ष वाट बघितली. अनेक लोकांनी बलिदान दिले. आण्णासाहेब पाटलांपासून ते काकासाहेब शिंदेंपर्यंत. लोकांनी आपले जीव दिले. पण एवढं सगळं करून सुद्धा आपल्या हातात काही पडलेलं नाही याची खूप मोठी शोकांतिका आहे. आणि आता अशा परिस्थितीमध्ये मराठा समाज मुग गिळून गप्प बसणार आहे का काय करणार आहे, हा खूप मोठा प्रश्न आहे. आणि यासंदर्भात मला असे वाटते की, ज्या घटनात्मक तरतुदींचा दाखला देत आधारे सुप्रीम कोर्टाने आपल्याला मराठा आरक्षण नाकारलं ते आपण बदलत नाही, तोपर्यंत आपल्याला आरक्षण मिळणार नाही. आणि म्हणून केंद्र सरकारने घटना बदलावी अशा पद्धतीचं आंदोलन आपल्याला करावे लागणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या ९ ऑगस्टला क्रांती दिनी दिल्लीमध्ये जंतरमंतरवर मी एक आंदोलन करायचा निर्णय घेतला आहे.
या आंदोलनामध्ये आपले जर ऐकले गेले नाही तर मी त्या वेळेला राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आणि जे काही बीजेपीचे विरोधी पक्ष आहेत त्यांनाही आव्हान करेन की तुम्ही एक स्थगत प्रस्ताव आणा आणि पार्लमेंट चालू देऊ नका कारण हा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. आणि म्हणून अशा स्थितींमध्ये हे ९ तारखेचं आंदोलन आपल्याला दिल्लीत अतिशय तडाखेबाज करायचे आहे. आपली बलिदानं, आपले विविध मोर्चे, मूक मोर्चे, ठोक मोर्चे हे सगळे झाल्यानंतर आज आपण जर मोकळ्या हातानी घरात जर गप्प बसणार असू, तर मला वाटतं ही जात मराठ्याची नाही. आणि त्यामुळे आपल्याला उठाव घ्यावाच लागणार आहे आणि त्याबद्दल ९ तारखेला तुम्हाला आणि मला एकत्र यावेच लागणार आहे.
या संविधानाची दुरुस्ती करावीच लागणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं विषय हा आहे की जी संविधानाने तरतूद केली आहे. आर्टिकल १४,१५,१६ डायरेक्ट प्रिन्सिपल ऑफ दी स्टेट पॉलिसीमध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड याचं अनुपालनच होत नाहीये. जर तुम्ही म्हणत असाल की, आम्ही सुरुवातीला आरक्षण फक्त १० वर्षांच्यासाठी दिले होते तर अर्थातच ते १० वर्षांसाठी ते संपले पाहिजे होते, पण ते संपले नाही याचे दोन अर्थ होतात. एक अर्थ असा होतो की तुम्ही आत्तापर्यंत या समाजाला ज्यांना आरक्षण मिळालं होत त्यांना तुम्ही आतापर्यंत पुढे आणू शकलेले नाही, हे सरकारचे सगळ्यात मोठे अपयश आहे.
दुसरी गोष्ट जर ते समाज घटक पुढे आलेलं असतील आणि तरीही तुम्ही त्यांना आरक्षण देणार असाल तर तुम्ही त्यांना पॉलिटिकल वोट बॅक म्हणून तर ट्रीट करत नाही का? अशा पद्धतीचासुद्धा प्रश्न निर्माण होतो. पण हे सगळं करत असताना शेवटी एकच गोष्ट खरी की काही लोकांना आरक्षण आहे आणि काही लोकांना नाही आणि म्हणून समाजामध्ये दुही निर्माण होत चालली आहे. सोशल इनइक्वॅलिटी होत चालली आहे. आज मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज असो जाट समाज असो, पटेल समाज असो, गुजर समाज असो इतक्या वर्षांपासून त्यांना न्याय मिळालेला नाही.
मला असं वाटत की आता जर का आपल्या संविधानात दिलेलं राईट टू इक्वॅलिटी समानतेचा अधिकार जो संविधानात दिलेला आहे त्याआधारे जर का आपल्याला पुढे मार्गक्रमण चालवायचे असेल तर आता मराठा आरक्षण मिळाले पाहिजे. आणि मराठा आरक्षण जर मिळाले नाही तर आरक्षण पद्धतच मुळात बंद करून टाकली पाहिजे. कारण डॉ.बाबासाहेब आंबेडकरानीच स्वतः सांगितले होते की फक्त १० वर्षांसाठी आरक्षण द्या पुढचं आरक्षण देऊ नका, त्यामुळे अशा स्थितीमध्ये तुम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचीही पायमल्ली करताय आणि काहीही करत सुटलाय.
त्यामुळे कुठे तरी मी आपल्याला अत्यंत कळकळीची विनंती आणि आव्हान करतो की जागे व्हा आणि जागे होऊन आपल्या आत्मसन्मानाची आणि आपल्या आत्मनिर्भरतेच प्रदर्शन त्याठिकाणी आपल्याला करावे लागेल जंतरमंतरला ९ तारखेला आपल्याला यावे लागेल आणि त्या जंतरमंतरच्या कार्यक्रमामध्ये भारतीय जनता पक्ष आणि विरोधी पक्षांना आपल्याला कुठे तरी खडबडून जागे करावे लागेल की, बस झाले तुमचे जे झाले ते पण आत्ता आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे. नसालं देत तर आरक्षणमुक्त भारत करा आणि दोन्ही ही पक्ष दोन्हीही गोष्टी करणार नसतील, तर अशा वेळेला काय करायचे? कारण मराठे तुम्हाला माहित आहेत मराठ्याची एक खूप मोठी खासियत आहे. दिल्लीचे ही तख्त राखितो मराठा माझा, महाराष्ट्र माझा, असे आपण म्हणतो. तर असं जर म्हणाल तर वावगं होणार नाही, जर असं म्हटलं की दिल्लीचेही तख्त गाडतो मराठा माझा महाराष्ट्र माझा. त्यामुळे दिल्लीचे तख्त राखूही शकतो आणि दिल्लीचे तख्त गाडूही शकतो. अशी ताकत आपल्यामध्ये आहे पण ती ताकत घेऊन बाहेर पडायला लागेल.
आज हर्षवर्धन जाधव स्वतः कोणी नाही परंतु आज एक धगधगती ज्वाला मनामध्ये आहे की जे काही सगळं केले. मीही आरक्षणासाठी राजीनामा विधानसभेचा दिला, आण्णासाहेब पाटीलांनी जे जीवनदान दिलं ते वाया गेलं का? काकासाहेब शिंदेंनी जे प्राणार्पण केलं, ते सगळं वाया गेलं का? ज्यावेळेस असे विचार येतात तेव्हा अक्षरशः मनाला वेदना होतात. त्यामुळे मी तर जाणार आहे. मी तर करणार आहे. आपणही यावे एवढीच आपल्याला विनंती. आणि जी मंडळी येणार नाहीत, त्यांनी त्या ९ तारखेचं प्रक्षेपण आपल्या सोशल मीडिया वर करावं आणि त्याच बरोबर जी काय मंडळी दानशूर आहेत ज्यांना देणगी देता येईल तर देणगी सुद्धा द्यावी. जेणेकरून तिथे आपल्याला जितके दिवस जास्त आंदोलन करता येईल तेवढे जास्त दिवस आपण आंदोलन करू. आता तुम्ही आता जागे व्हा आणि परिवर्तनाचा धागा व्हा.