मुक्तपीठ टीम
मंगळवारचा दिवस हा केंद्रीय मंत्री नारायण राणेंसाठी फारच समस्यांचा ठरला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरुद्ध केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांना रत्नागिरी पोलिसांनी अटकही केली. मात्र रात्री उशिरा राणेंना महाड न्यायालयाकडून जामीन मिळाला असला तरी त्यांचा पुढचा मार्ग अवघडच आहे.
ठाकरेंविरोधातील भूमिका, वक्तव्य हे त्यांचं राजकीय अस्तित्वाचं सर्वात मोठं भांडवल आहे. मात्र, आता न्यायालयानं जामीन देताना पुन्हा तसं वक्तव्य न करण्यासही बजावलं आहे. त्यामुळे शब्द जपूनच वापराले लागतील. तसेच पोलिसांसमोर हजेरीची अटही आहे. त्यात महाडचं प्रकरणाचा जामीन मंजूर होताच राणेंना आता नाशिक पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे. यामुळे राणेंसमोर नव्या समस्या उभ्या राहताना दिसत आहेत.
नारायण राणेंना अटी-शर्तीवरील जामीन
- कोणत्याही आरोपीला जामीन मंजूर करताना न्यायालयाकडून अटी-शर्ती लागू केल्या जातात.
- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाही जामीन मंजूर करताना न्यायालयानं काही अटी-शर्ती सांगितल्या आहेत.
- नारायण राणे यांना भविष्यात असं वक्तव्य न करण्यास न्यायालयानं बजावलं आहे.
- न्यायालयानं ३१ ऑगस्ट आणि १३ सप्टेंबरला रायगड जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे हजेरी लावण्याचे आदेश दिले आहेत.
- पोलिसांना जेव्हा पाहिजे तेव्हा आवाजाचे नमुने उपलब्ध करून देण्याचे आदेश कोर्टानं राणेंना दिले आहेत.
- इतर आरोपींना दिली जाते तशी बाहेर आल्यानंतर साक्षीदारांवर दबाव न आणण्याची आणि पुराव्यांशी छेडछाड न करण्याची सूचनादेखील न्यायालयानं राणेंना दिली आहे.
A Raigad Magistrate Court has granted bail to Union Minister #NarayanRane in one of the FIRs filed against him. Massive egg on the face of the dictatorial Maharashtra Govt!! pic.twitter.com/qqkcapHnCM
— Priti Gandhi – प्रीति गांधी (@MrsGandhi) August 24, 2021
नाशिक पोलिसांची नोटीस
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत केलेले वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर राज्यातील काही पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नाशिक पोलीस ठाण्यातही त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच संदर्भात नाशिक पोलिसांनी राणेंना नोटीस बजावली आहे. राणेंना २ सप्टेंबर रोजी पोलिसांसमोर हजर राहण्यास सांगितले आहे. नाशिकमध्ये दाखल गुन्ह्याच्या संदर्भात जबाब घेण्यासाठी पोलिसांनी ही नोटीस दिली आहे.