मुक्तपीठ टीम
ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर व्हावी यासाठी पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या जल जीवन मिशन अंतर्गत औरंगाबाद, बुलडाणा, अकोला आणि नाशिक जिल्ह्यातील विविध प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचे पत्र आज पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संबंधितांना देण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मान्यतेमुळे ग्रामीण भागाशी निगडित ही कामे वेगाने मार्गी लावता येत असल्याची भावना गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनीही दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित राहून सर्व संबंधितांचे अभिनंदन केले आणि या योजना वेळेत पूर्ण होतील आणि कामे दर्जेदार होतील याकडे लक्ष देण्याची सूचना केली.
मंत्रालयात झालेल्या या कार्यक्रमास रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, प्रताप जाधव, अंबादास दानवे, रायमुलवार यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते
पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, राज्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणाऱ्या गावामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत प्रादेशिक पाणी पुरवठा योजना राबविल्या जात आहेत. नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी ओढाताण थांबावी यासाठी या योजनेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. आज झालेल्या कार्यक्रमात जानेफळ कळंबेश्वर प्रादेशिक पाणी पुरवठा योजना (ता. मेहकर जि. बुलढाणा), चिंचोली व ३० गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना (ता. खामगाव व शेगाव जि. बुलढाणा), पाडळी व ५ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना (ता. जि. बुलढाणा), १७८ गावे पैठण ग्रीड पाणी पुरवठा योजना (ता. पैठण व औरंगाबाद जि. औरंगाबाद ), तेल्हारा व ६९ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना ता. तेल्हारा जि. अकोला, घाटपुरी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना (ता. खामगाव जि. बुलढाणा) आणि घोटी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना (ता. इगतपुरी, जि. नाशिक) या योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
जल जीवन मिशन अंतर्गत १७८ गावे पैठण ग्रीड पाणी पुरवठा योजनेची अंदाजपत्रकीय किंमत रू. ३०७ कोटी आहे. या योजनेअंतर्गत पैठण व औरंगाबाद तालुक्यातील १७८ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. योजनेच्या रू. ३०७ कोटी किंमतीच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
जानेफळ कळंबेश्वर प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची अंदाजपत्रकीय किंमत रू. १० कोटी आहे. या योजनेअंतर्गत जानेफळ व कळंबेश्वर या गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. योजनेच्या रू. १० कोटी किंमतीच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
जल जीवन मिशन अंतर्गत चिंचोली व ३० गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची अंदाजपत्रकीय किंमत रू. ८८ कोटी ३५ लक्ष आहे. या योजनेअंतर्गत खामगाव व शेगाव तालुक्यातील ३१ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या योजनेच्या रू. ८८ कोटी ३५ लक्ष किंमतीच्या निधीसही प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
पाडळी व ५ प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची अंदाजपत्रकीय किंमत रू. १६ कोटी ०९ लक्ष आहे. या योजनेअंतर्गत बुलढाणा तालुक्यातील ६ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या योजनेच्या रू. १६ कोटी ०९ लक्ष किंमतीच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
तेल्हारा व ६९ प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची अंदाजपत्रकीय किंमत रू. १४८ कोटी ४३ लक्ष आहे. या योजनेअंतर्गत तेल्हारा तालुक्यातील ७० गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या योजनेच्या रू. १४८ कोटी ४३ लक्ष किंमतीच्या निधीसही प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
घाटपुरी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची अंदाजपत्रकीय किंमत रू. १८ कोटी ७८ लक्ष आहे. या योजनेअंतर्गत घाटपुरी या गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या योजनेच्या रू. १८ कोटी ७८ लक्ष किंमतीच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली. याशिवाय घोटी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या २२ कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता दिल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.