मुक्तपीठ टीम
नागपूर जिल्ह्यातील नांदगाव परिसरात खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रातील टाकल्या जाणाऱ्या राखेची पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून ही राख टाकणे बंद करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आता ही राख टाकणे बंद झाले असून यापूर्वी टाकलेली राख पावसाळ्यापूर्वी उचलण्याचे निर्देश आदित्य ठाकरे यांनी आज झालेल्या बैठकीत दिले. पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण नियंत्रणासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांमुळे कॉप-26 या आंतरराष्ट्रीय पर्यावरण परिषदेनंतर महाराष्ट्राच्या कामगिरीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर नेट झिरो कडे वाटचाल करताना सर्वच औष्णिक केंद्रांनीही प्रदूषण नियंत्रणासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
नांदगाव येथील सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्व संबंधितांची ऑनलाईन आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, महाजनकोचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिनगारे, मंडळाचे नागपूर विभागीय अधिकारी अशोक कारे, महानिर्मितीचे कार्यकारी संचालक नितीन वाघ, अभय हरणे, खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता श्री. घुगे आदी उपस्थित होते.
आदित्य ठाकरे म्हणाले, नांदगाव येथे औष्णिक विद्युत केंद्रातील राख टाकली जात असल्याने या परिसरातील अनेक कुटुंबांना दुष्परिणामांना सामोरे जावे लागत होते. ही राख टाकणे बंद करण्यात आल्यानंतर येथील रहिवाशांमध्ये समाधान असून येथे असलेल्या राखेमुळे त्यांना पावसाळ्यात त्रास होऊ नये यासाठी येत्या पावसाळ्यापूर्वी ती उचलण्यात यावी. सध्या राख असलेल्या जागेवर भविष्यात झाडे लावणे, सोलार ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करणे आदी पर्यायांचा विचार करण्याची तसेच नांदगाव परिसरातील स्थानिकांना नोकरीत सामावून घेण्यासाठी उपाययोजना करण्याची सूचना त्यांनी केली. या परिसरातील रहिवाशांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांना सोबत घेऊन पुढे जाणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. यासाठी लवकरच ऊर्जा मंत्र्यांसमवेत संयुक्त बैठक घेऊ, असेही ते म्हणाले.
प्रधान सचिव म्हैसकर म्हणाल्या, राज्यातील विजेची गरज पाहता औष्णिक विद्युत केंद्रांची आवश्यकता अपरिहार्य आहे. तथापि केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन कमीत कमी प्रदूषण होईल यासाठी व्यवस्थापनांनी कालबद्ध नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री.खंदारे यांनी यापुढे औष्णिक विद्युत प्रकल्पावरून थेट राख नेण्यासाठी एजन्सी नेमण्यात येत असल्याची माहिती देऊन यापुढे राख खुल्या जागेत सोडण्यात येणार नसल्याचे सांगितले.
प्रारंभी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव शिनगारे यांनी नांदगाव-खापरखेडा परिसरातील सद्यस्थिती आणि मंडळाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली.