मुक्तपीठ टीम
राज्यात सुरू असलेल्या ३२ व्या राज्य रस्ते सुरक्षा अभियान निमित्ताने शिव वाहतूक सेना आणि युवासेवा फाऊंडेशन यांच्यातर्फे गोरेगाव वाहतूक विभागातील वाहतूक पोलीस बांधवांना तसेच दुचाकीस्वार वाहनचालकांना मोफत शिरस्त्राणे, परावर्तक जाकीट, रस्ते सुरक्षा मार्गदर्शिका पुस्तिका, प्रथमोपचार पेटी आणि अग्निप्रतिबंधक उपकरण यांचे वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रमास शिवसेना खासदार गजानन किर्तीकर, सिनेअभिनेते श्रेयस तळपदे, माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा, युवासेना सरचिटणीस अमोल किर्तीकर, स.पो.नि.उत्तर परिक्षेत्र कपिले मॅडम, क्रिकेट प्रशिक्षक निलेश भोसले, प्रभारी वाहतूक निरीक्षक मुकुंद यादव आदी मान्यवर उपस्थित होते. रस्ते सुरक्षा प्रवक्ते विनय मोरे यांनी यावेळी माहितीपुर्ण मार्गदर्शन केले.
प्रसंगी अभिनेता श्रेयस तळपदे यांनी आपल्या संवादपर भाषणात वाहनचालकांच्या मानसिकतेवर भाष्य केले. “हेल्मेट हे केवळ वाहतूक पोलीस दिसल्यावरच घालण्याची गोष्ट नाही, तर आपल्या स्वत:च्या सुरक्षेसाठी आहे. हेल्मेट घालून केसं खराब झालेले चालतील पण स्वत:चे आणि आपल्या कुटुंबियांचे आयुष्य उध्द्वस्त करू नका. डोकं शाबूत ठेवण्यासाठी डोक्याचा वापर करा…हेल्मेट वापरा” असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले.
Extremely happy to meet @GajananKirtikar kaka after a really long time, you were sweet as ever. Ty Ajay Kaul sir & Prashant sir for inviting me to the #RoadSafety Awareness Drive organized by Mumbai traffic police & Yuva Sena🙌 pic.twitter.com/O9w4sytIaW
— Shreyas Talpade (@shreyastalpade1) February 16, 2021
सदर उपक्रमाचे आयोजन मोहन गोयल यांनी केले तर सुत्रसंचालन कल्पेश बालघरे यांनी केले. कार्यक्रमस्थळी रस्ते सुरक्षाविषयक प्रबोधन करणारा शिरविरहीत मनुष्य देखील सगळ्यांचे विशेष लक्ष वेधुन घेत होता.