मुक्तपीठ टीम
अभिनेते सयाजी शिंदे हे गेल्या अनेक वर्षांपासून सह्याद्री देवराईच्या माध्यमातून राज्यभर वृक्षारोपणाचे काम करत आहेत. ते कायमच झाडांच्या संवर्धनासाठी आणि वृक्षारोपण करण्यासाठी आग्रही असतात. त्यामुळे त्यांनी हाती घेतलेलं हे काम आता लोकचळवळ होऊ लागल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे यंदाच्या शिवजयंतीनिमित्ताने सयाजी शिंदे यांनी एक नवीन मोहिम हाती घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडाकिल्ल्यांवर मशाल पेटली पाहिजे, पर्यावरणरक्षणाची हिरवी मशालही दिसली पाहिजे, असे शिंदे यांनी म्हटले, ते स्वत: शिवजयंती दिनी पन्हाळागडावर जाऊन वृक्षारोपन करणार आहेत.
“सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात स्वराज्याचं स्वप्न पाहिलेले माझे राजे छत्रपती शिवाजी महाराज. सोबतीला मावळे होते, या मावळ्यांना आणि राजांना झाडांनीही साथ दिली. सह्याद्रीच्या प्रत्येक झांडांचीही स्वराज व्हाव हीच इच्छा होती, पण पूर्ण सह्याद्री बोडका करुन टाकलाय आपण. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही, झाडं म्हणजे रयतेची लेकरं, असं तळमळीनं सांगणाऱ्या महाराजांचं आपण ऐकणार आहोत की, नाही? आपण शिवरायांचे मावळे आहोत, येत्या शिवजयंतीला प्रत्येक गडावर ४०० झाडे लावण्याचा संकल्प आपण करुयात.गडावर मशाल घेऊन जाऊ, पण हिरवी मशाल.. झाडांची मशाल… कारण झाडाशिवाय गडाला शोभा नाही”, असे सयाजी शिंदे यांनी म्हटलं. सयाजी शिंदेंचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, सयाजी शिंदे यांच्या तंबुरा या पुस्तकाचही दोन दिवसांपूर्वी प्रकाशन झाले आहे, त्यावेळीही वृक्षसंवर्धन मोठ्या प्रमाणात होणे गरजेचं असल्याचं मत सयाजी शिंदेंनी व्यक्त केलं.
सयाजी शिंदे यांचा या उपक्रमासाठी आवाहन करणारा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी यंदा शिवजयंतीला प्रत्येक गडावर ४०० झाडं लावण्याचा संकल्प केला आहे. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांवर हिरवी मशाल दिसली पाहिजे, असं आवाहनदेखील त्यांनी केलं आहे. इतकंच नाही तर शिवजयंतीनिमित्त ते स्वत: पन्हाळगडावर जाऊन वृक्षारोपण करणार आहेत.
पाहा व्हिडीओ: