मुक्तपीठ टीम
अभिजीत रमेशराव कदम हे मूळचे हदगाव तालुक्याच्या साप्ती गावातील रहिवाशी. ते सध्या नागपुरात सोलार सेलच्या कार्यक्षमतेत वाढ करणाऱ्या पदार्थ संशोधन कार्यावर काम करत आहेत. अभिजीत रमेशराव कदम व त्यांचे मार्गदर्शक डॉ. संजय ढोबळे यांनी आता सोलार सेलच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी डाउनकॉन्व्हर्शन फॉस्फरस यशस्वीरित्या तयार केले आहेत. यासाठी त्यांनी या उत्पादक कल्पनेवर सातत्याने कार्य केले आणि ऑस्ट्रेलियन सरकारने त्यांना एका महिन्यामध्ये दोन ऑस्ट्रेलियन पेटंट्सला मान्यता दिली आहे.
मराठी माणसांचं सोलर संशोधन
• “ल्युमिनेसेन्स क्षेत्रातील अभिजीत कदम व डॉ. ढोबळे यांचे संशोधन सौर उर्जेपासून मिळणाऱ्या उर्जेमध्ये वाढ करण्याच्या उद्देशाने केले गेले आहे.
• निसर्गामध्ये सौरऊर्जा हा कधीही न संपणारा व अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.
• या ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करता यावा यासाठी अभिजीत कदमनी सोलार सेलवर विशिष्ट पद्धतीने ल्युमिनेसेन्स पदार्थाचे कोटिंग करून सोलार सेलची कार्यक्षमता वाढविण्याचे कार्य केले आहे. हे सौरऊर्जा क्षेत्रातील एक क्रांतिकारक पाऊल असू शकते असे अभिजीत कदम म्हणाले.
• अभिजीत कदम यांना ल्युमिनेसन्सच्या वेगवेगळ्या क्षेत्रात आजपर्यंत ४ पेटंट्सला मान्यता मिळाली आहे आणि यांनी ३ पेटंट प्रकाशित केले आहे असे एकूण ७ पेटंट्सची नोंद त्यांच्या नावावर केली गेली आहे.
अभिजीतला आणखीही खूप करायचंय…
• अभिजीत कदम यांनी आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर २६ शोधनिबंध प्रकाशित केले असून, ही कामगिरी त्यांनी फक्त दोन वर्षात केली आहे हे विशेष.
• अभिजीत कदम यांनी समाजात वैज्ञानिक स्वभाव निर्माण करण्यावर आणि संशोधकांच्या नवकल्पनांना प्रोत्साहित करण्यासाठी पायाभूत आधार सुधारण्यावर भर द्यायचा आहे.
• समाजाच्या उन्नतीसाठी आपल्याला अजून बऱ्याच काही नवकल्पनावर काम करण्याची आवश्यकता आहे असे अभिजीत कदम म्हणाले.
या कामगिरीबद्दल रा. तु. म. नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरू मा. डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, आय आय एल चे संचालक डॉ.राजेश सिंग, पदार्थ विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश चिमणकर आणि मार्गदर्शक डॉ. संजय ढोबळे यांनी अभिजीत कदम यांचे अभिनंदन केले.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी म्हणाले, “अभिजीत कदम नाविन्यपूर्ण कल्पनांवर काम करत आहेत आणि त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळविली हे त्यांच्या कर्तृत्वाचे आणि दुरदृष्टीविषयी बोलणारे कार्य आहे. विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून माझ्यासाठी आणि विद्यापीठाच्या सर्व संशोधकांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे की, अभिजीत कदम हे सतत भविष्यात बदल घडवून आणण्यासाठी नवकल्पना घेऊन येत आहेत.”