मुक्तपीठ टीम
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा हा पेटला आहे. काल कोल्हापूरात रास्ता रोको आंदोलन पार पडले. यावेळी मराठा समाजातील आक्रोश पाहायला मिळाला. दरम्यान राज्यात ओबीसींचे राजकीय आरक्षण होत नाही तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, अशी भूमिका असेल तर, आम्हीही नोकर भरती होऊ देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी दिला आहे.
राज्यात ओबीसींचे राजकीय आरक्षण होत नाही तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, अशी भूमिका विजय वडेट्टीवारांची असेल तर त्याच धर्तीवर मराठा क्रांती ठोक मोर्चाही मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत नोकरभरती होऊ देणार नाही. जोपर्यंत मराठा आरक्षण लागू होणार नाही, तोपर्यंत नोकर भरती आणि शाळा-कॉलेजची प्रवेश प्रक्रियाही होऊ देणार नाही, आसा इशारा पाटील यांनी दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयान आरक्षण नाकारल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. खासदार संभाजी छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर आणि नाशिकमध्ये मराठा मूक आंदोलन पार पडले. त्यानंतर त्यांची सरकार सोबत झालेल्या चर्चेनंतर संभाजी छत्रपतींनी आंदोलन महिनाभरासाठी स्थगित केलं आहे. दरम्यान राज्यसरकार मराठा समाज आणि संभाजी छत्रपतींची फक्त दिशाभूल करत असल्याचा दावा केला जात आहे. काल कोल्हापुरात सकल मराठा समाजाने समरजितसिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखाली ताराराणी चौकात ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. यावेळी ‘मराठा क्रांती मूक मोर्चा नाही, आता मराठा क्रांती ठोक मोर्चा’ अशा टॅगलाईनने झालेल्या या आंदोलनात सरकारला आता ठोकल्याशिवाय पर्याय नाही, अशा शब्दांत समरजित घाटगे यांनी इशारा दिला.