मुक्तपीठ टीम
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाकरिता सन २०२१ ते २०२६ हया कालावधीसाठी मजूर सहकारी संस्था मतदार संघातील रिक्त जागेसाठी होऊ घातलेल्या निवडणूक प्रक्रियेत कायद्याचे उल्लंघन, तसेच सदोष मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. यासंदर्भात आम आदमी पार्टीचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी श्रीमंत मजूर प्रकाश यशवंत दरेकर यांच्या नामनिर्देशन उमेदवारी अर्जावर आक्षेप नोंदवला आहे.
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील मजूर सहकारी संस्थेच्या मतदार संघातील सुधारित निवडणूक कार्यक्रम दि ५/१०/२०२२ रोजी एका वृत्तपत्रात प्रसिध्द करण्यात आला. प्रसिध्द केलेला निवडणूक कार्यक्रमात नमुद ई – ४ (नियम १९) अन्वये अनुसूचीच्या तक्ता जाहिर केला गेला नाही. सुधारित निवडणूक कार्यक्रमात नामनिर्देशन पत्र मिळण्याची व दाखल करण्यासाठी दोनच दिवसाची मुदत दिली होती. येथे ४ दिवसाची मुदत देणे अपेक्षित होते. एका वृत्तपत्रातील जाहिरातीत कोणत्या प्रर्वगासाठी निवडणूक होत आहे व ती कधी कोणत्या दिवशी घेण्यात येत आहे याचा साधा उल्लेखही करण्यात आला नव्हता. यात दिलेल्या संकेतस्थळावर व संस्थेच्या ऑनलाईन लिंकवर माहिती उपलब्ध आहे,असे नमूद करण्यात आले होते. अशा प्रकारची जाहिरात सहकार खात्याच्या इतिहासात पहिल्यांदा घडलेली आहे.
विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था मुंबई यांचे दि. ३/१/२०२२ रोजीच्या आदेशान्वये मुंबई बँकेचे विद्यमान अध्यक्ष माजी विरोधी पक्षनेते आमदार प्रविण यशवंत दरेकर यांना मजूर म्हणून अपात्र घोषित करण्यात आले होते. तरी मुंबई बँकेच्या मजूर सहकारी संस्था मतदार संघातील अंतिम मतदार यादीत अद्यापही प्रविण यशवंत दरेकर यांचे नाव वगळण्यात आलेले नाही. याचा अर्थ सदोष मतदार यादी जाहिर करण्यात आलेली आहे. दरम्यान प्रकाश यशवंत दरेकर यांचा मजूर मतदार संघात एकच नामनिर्देशन उमेदवारी अर्ज प्राप्त झाला असून प्रकाश दरेकर हे श्रीमंत मजूर म्हणून बाद ठरलेल्या प्रविण दरेकर यांचे सख्खे भाऊ आहेत. प्रकाश यशवंत दरेकर हे मुंबई महानगरपालिकेत सन २०१२ साली नगरसेवक होते व सन २०१७ साली नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज भरला होता. सदर अर्जाच्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी करोडो रुपयांची जंगम मालमत्ता तसेच त्यांचा स्वतंत्र धंदा व्यापार असा उल्लेख केला होता. दरवर्षी व्यापार या धंदयातून लाखो.
रुपयांचे वार्षिक उत्पन्न मिळत असल्याची नोंद आयकर विभागाकडे केलेली आहे. मजूर संस्थेचा सभासद होण्यासाठी तो मजूर असणे आवश्यक आहे. तसेच कालकाई मजूर सहकारी संस्थेत ते सुपरवाईझर या पदावर कार्यरत आहेत. सदर पद हे संस्थेच्या कर्मचारी संवर्गात येते. त्यामुळे प्रकाश दरेकर यांनी मजूर सभासद म्हणून खोटी नोंद केल्याचे दिसून येते. त्यामुळे प्रथम दर्शनी ते मजूर म्हणून अपात्र आहेत. वरील सर्व बाबी लक्षात घेता, भाजप चे मुंबई उपाध्यक्ष आणि माजी नगरसेवक प्रकाश दरेकर यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्याची तक्रार तसेच बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याबाबतची तक्रार जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक यांच्याकडे आम आदमी पार्टीचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी केली आहे.