सायली नातू
सायली नातू ह्या केवळ गृहिणीच नाही तर अंधेरी येथील भवन्स कॉलेजमध्ये प्रोफेसर देखील आहेत, त्यांनी बीएमएममधून ग्रॅज्युएशन केले आहे आणि एमजेएमसीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे, त्या राज्य पात्रता परीक्षेत सुद्धा उत्तीर्ण आहेत. आता त्यांनी कंपॅरिटिव्ह मायथॉलॉजिमध्ये पदव्युत्तर पदविकासाठी परीक्षा दिली आहे. एवढ्या व्यस्त असुन सुद्धा त्यांना कविता लिहायला आवडतात. खालील लिहीलेल्या कविता ह्या त्यांनी रचलेल्या आहेत.
आळसाचा कळस
नेहमीच आईची तक्रार असते
आजकाल काही लिहित नाहीस
माझंही उत्तर ठरलेलंच असतं
आजकाल काही सुचत नाही
शब्दाने शब्द वाढत जातो
दोघीही मागे हटत नाही
विषय बदलून बोलण्याखेरीज
मग पर्याय उरत नाही
खरं सांगू का तुम्हाला?
सुचत नाही अगदीच असंच काही नाही
पण कोण उठून वही पेन आणेल?
म्हणून विचार शब्दांकित होत नाहीत
विचारलं कोणी आजकाल
कविता तुझ्या गेल्या कुठे?
“वेळ नाही”, “सुचत नाही”
अशी कारणं मग येतात पुढे
आजही असाच परत विचार आला
पण ठिय्या करून बसलाय आळस
लोळत लोळत, व्हॉटसॅप बघत
आळशीपणाचा मी गाठला कळस
मग दुसरा विचार आला मनात
आहे तरी कोण आळस हा?
हिम्मत तरी पहा याची
धाडस करतोय पुन्हा पुन्हा
अहो कसले म्हणून काय विचारता?
शब्द माझ्यापासून ठेवतोय लांब
ठाण मांडून बसलाय अंगात माझ्या
धड करू देत नाही एकही काम
मग ठरवले मनातल्या मनात
उतरवायचा या आळसाचा माज
शब्दांना दिली करून वाट मोकळी
पहा न! कविता लगेच खुलली आज!