मुक्तपीठ टीम
हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील ताकतोडा गावचे शेतकरी नामदेव पतंगे यांनी मुख्यमंत्र्यांकडे नक्षलवादी होण्यासाठी परवानगी मागितली आहे. अशीच विनंती त्यांनी स्थानिक तहसीलदारांनाही केली आहे.
स्थानिक प्रशासन आणि सरकारची शेतकऱ्यांविषयीचा उदासीन भूमिका लक्षात घेता पतंग यांनी ही विनंती केली आहे, असं ते म्हणतात. पतंगे म्हणतात की, “बँक शेतकऱ्यांना पिकांसाठी कर्ज देत नाही. शेतकर्यांचे शेतीचे नुकसान झाले असूनही त्यांना पीक विम्याचा लाभ मिळत नाही. याशिवाय कर्ज माफीचा कोणताही फायदा त्यांच्यापर्यंत आणि अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला नाही.”
प्रश्न विचारले, तर खटला!
त्रस्त शेतकरी पतंगे यांनी आपल्या विनंती पत्रात असे लिहिले आहे की, “जेव्हा तुम्ही प्रशासनाला याबाबत काही विचारण्याचा प्रयत्न करता, तेव्हा सरकारी कामात अडथळा आणण्याच्या नावाखाली कलम ३५३ अन्वये खटला दाखल करण्याची धमकी दिली जात आहे. तसेही शेतकऱ्यांना प्रशासनाचे सहकार्य मिळत नाही.”
पतंग म्हणाले की, “शेतकर्यांच्या सर्व योजना योग्य पद्धतीने राबविल्या जात नाहीत. कोरोना साथीचा फटका बसला. अवेळी पाऊस, अतिवृष्टीमुळे पिके खराब झाली आहेत. या संदर्भात जेव्हा जेव्हा कोणतीही तक्रार किंवा विनंती केली जाते तेव्हा प्रशासन त्याकडे लक्ष देत नाही.”