मुक्तपीठ टीम
कोरोना महामारीला रोखण्यासाठी देशात काही महिन्यांपासून प्रतिबंधात्मक लसीच्या लसीकरणास सुरुवात झाली आहे. दरम्यान, “लसीकरण हे देशातील डिजिटल हेल्थसाठी मोठी झेप ठरू शकते. लसीकरणासाठी ‘को-विन अॅप’ दररोज कोट्यवधी लसीकरणाचा डेटा हाताळण्यासाठी सक्षम आहे. त्यामुळे गोळा केलेला डेटा भविष्यात लाभार्थ्यांना इतर सेवा देण्यासाठी देखील वापरला जाऊ शकतो”, अशी माहिती राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आरएस शर्मा यांनी एका माध्यम संस्थेशी बोलतांना दिली.
डिजिटल हेल्थ ओळखपत्राचा फायदा
- लसीकरणाच्या वेळी नोंदणीनंतर प्रत्येक लाभार्थ्यांचा डिजिटल हेल्थ ओळखपत्र तयार केला जात आहे.
- लाभार्थी इतर आरोग्य सेवांसाठी हा डिजिटल हेल्थ ओळखपत्र वापरण्यास सक्षम असतील.
- डिजिटल हेल्थ ओळखपत्राशी संबंधित लाभर्थींचा आजार, चाचण्यांविषयी आणि उपचारा संबंधित सर्व डेटा डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असतील, जे एका क्लिकवर पाहिले जाऊ शकते.
- याद्वारे टेलिमेडिसिनची सुविधा देखील लाभार्थांना मिळेल. यामध्ये रुग्णालयात किंवा डॉक्टरांकडे उपचारांसाठी जाण्याचा वेळ ही सुचवेल. त्यामुळे किरकोळ आजारांसाठी लोकांना रुग्णालयात जाण्यापासून मुक्तता मिळेल.
लसीकरणाप्रमाणे देशभरात डिजिटल हेल्थ मिशनची अंमलबजावणी झाल्यानंतर कोट्यवधी लोकांचा डेटा दररोज हाताळण्याची आणि त्यावर प्रक्रिया करण्याची आवश्यकता असेल. डिजिटल हेल्थ मिशनच्या रूपरेषा सांगत शर्मा म्हणाल्या की, सर्वसामान्यांना आणि सेवा पुरवणाऱ्यांना अॅमेझॉनसारखे प्लॅटफॉर्म उपलब्ध होईल. याद्वारे सामान्य लोक चांगले उपचार चांगल्या पॅकेजसह करु शकतात.
सध्या पाच राज्यांमध्ये डिजिटल हेल्थ मिशन सुरू करण्यात आले आहे. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या व्यासपीठावर देशातील कोणतीही व्यक्ती त्यांचा आधार क्रमांक नोंदवून डिजिटल आयडी मिळवू शकते. तसेच को-विन अॅपच्या अनुभवाचा लाभ डिजिटल हेल्थ मिशनसाठी करता येऊ शकतो.