गुजरातमधील जामनगरमध्ये केवळ देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठे प्राणीसंग्रहालय उभारण्यात येणार आहे. या प्राणीसंग्रहालयात देशभरातील आणि जगातील १०० भिन्न प्रजातींचे प्राणी, पक्षी आणि सरपटणारे प्राणी ठेवले जातील. हे प्राणीसंग्रहालय रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड उभारणार आहे. रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा सर्वात धाकटा मुलगा अनंत अंबानी याला प्राणीसंग्रहालय बांधण्यात रस आहे.
प्राणीसंग्रहालय २८० एकर जमिनीवर बनविण्यात येणार आहे. जामनगरमधील कंपनीच्या मोती खवाडी प्रकल्पाजवळ ही जमीन आहे. कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्ंयाच्या म्हणण्यानुसार, कोरोनाव्हायरसमुळे या प्रकल्पाला आधीच उशीर झाला आहे आणि सर्व काही वेळेत झाल्यास पुढील दोन वर्षांत हे प्राणीसंग्रहालय सर्वसामान्यांसाठी उघडेल. रिलायन्सच्या कॉर्पोरेट अफेयर्सचे संचालक परिमल नथवानी म्हणाले, प्राणी संग्रहालयासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून सर्व आवश्यक मान्यता मंजूर झाल्या आहेत.
प्राणीसंग्रहालयात प्राण्यांच्या प्रजातीनुसार अनेक विभाग असतील – जसे की फॉरेस्ट ऑफ इंडिया, फ्रॉग हाऊस, किटकांचे जीवन, ड्रॅगन लँड, एक्झॉटिक आयलँड. या विभागांचा लेआउट केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरण वेबसाइटवर देखील सामायिक केला जाईल.