मुक्तपीठ टीम
मुंबईत दररोज कोरोनाचे नवे रुग्ण सापडतं आहेत. मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढीचा वेग कमालीचा वाढला आहे. दरम्यान मुंबईतील प्रसिद्ध रेस्ट्रॉरंटमधील १० कर्मचारी करोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. त्यांना बीकेसी येथील जम्बो कोरोना सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर मुंबईतील सर्व हॉटेल, पब, क्लब, बारमध्ये ग्राहकांची गर्दी वाढत आहे. मास्क आणि सुरक्षित अंतराचे नियम पाळले जात नसल्याने गेल्या काही दिवसात पालिकेकडून अनेक हॉटेलांवर, लग्न समारंभावर कोरोना संबंधित नियमांचे पालन होते की नाही, याची खात्री करण्यासाठी रात्री उशिरा अचानक धाड टाकून तपासणी करण्यात येत आहे. मुंबईतील प्रसिद्ध राधाकृष्ण रेस्टॉरंटमधील १० कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
दोन दिवसापूर्वी अंधेरी पश्चिमेकडील राधाकृष्ण हॉटेलमध्ये धाड टाकण्यात आली होती. यावेळी हॉटेलमधील कर्मचारी नियमांचे पालन करत नसल्याचे लक्षात येताच त्यांना कोरोना चाचण्या करण्यास सांगण्यात आल्या होत्या. त्याचे अहवाल शुक्रवारी आले असून दहा कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याचे आढळून आले आहे.
बृहन्मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या रेस्टॉरंटमध्ये ३५ कर्मचारी कार्यरत आहेत. कोरोना पॉझिटिव्ह निघालेल्या कर्मचाऱ्यांना बीकेसीतील जम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं असून, इतरांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. त्यामुळे रेस्टॉरंट दोन दिवसांसाठी बंद करण्यात आलं आहे. सॅनिटाइज केल्यानंतर आणि नवीन कर्मचारी आल्यानंतर पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली जाईल.