मुक्तपीठ टीम
राज्यात अमृत महाआवास अभियानाद्वारे प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनांमधील सर्व लाभार्थींना घरे मिळणार आहेत. या अभियानात नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून गतिमानतेने व गुणवत्तापूर्ण, दर्जेदार घरांची निर्मिती होणार असल्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. आतापर्यंत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व राज्य शासनाच्या योजनांतून १३.१४ लाख घरकुले पूर्ण करण्यात आली असून ५.६१ लाख घरे प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) मध्ये राज्याला आतापर्यंत १४.२६ लाख उद्दिष्ट प्राप्त झाले असून त्यापैकी १३.६० लाख (९५%) मंजुरी दिली आहे. उर्वरित लाभार्थींच्या मंजुरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून मंजूर घरकुलांपैकी ९.४८ लाख घरकुले विविध योजनांच्या कृतीसंगमातून पूर्ण झाली आहेत. राज्य शासनाच्या आवास योजना जसे रमाई, शबरी, आदिम, पारधी, यशवंत, अटल यामधूनही घरकुलाचा लाभ देण्यात येतो. यामधील ५.१५ लाख घरकुले मंजूर करण्यात आली असून ३.६६ लाख घरकुले पूर्ण झाली आहेत.
भूमिहीन लाभार्थींना जागा उपलब्ध करून देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य देशामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. आजअखेर ६६ हजार पेक्षा अधिक भूमिहीन लाभार्थींना राज्यामध्ये जागा उपलब्ध करून देण्यात आली असून उर्वरित भूमिहीन लाभार्थींना जागा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच जागेची समस्या सोडविण्यासाठी बहुमजली इमारती, गृहसंकुले, अपार्टमेंट अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांनाही प्रोत्साहन देण्यात येत आहे, असेही मंत्री गिरिश महाजन यांनी सांगितले.