मुक्तपीठ टीम
आयकर विभागाने बुधवारी मुंबई आणि पुण्यातील ४ बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घर आणि कार्यालयावर छापे टाकले. अभिनेत्री तापसी पन्नू, निर्माता अनुराग कश्यप, विकास बहल आणि मधु मंटेना हे चार सेलिब्रिटी आयकर विभागाच्या रडारवर आले आहेत. सलग दुसऱ्या दिवशीदेखील ही कारवाई सुरु होती. आयकर विभागाच्या या छापेमारीत महाघोटाळा झाल्याचे आता समोर आले आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ सीबीडीटीने सांगितले की, एकूण ३७० कोटी रुपयांचा कर चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे.
आयकर छाप्यात ४ मोठे गौप्यस्फोट करण्यात आले आहेत
- सीबीडीटीच्या मते, असे कळले आहे की आघाडीच्या प्रॉडक्शन हाऊसने त्याच्या बॉक्स ऑफिसच्या वास्तविक उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्न दर्शविली आहे. ही गडबड सुमारे ३०० कोटी रुपये आहे. प्रॉडक्शन हाऊस याचा हिशोब देऊ शकत नाही.
- एका प्रॉडक्शन हाऊसने शेअर्सच्या व्यवहारातील त्यांची किंमत कमी दाखवली. व्यवहारामध्येही काही गैगव्यवहार केले आहेत. हे संपूर्ण प्रकरण कर चोरीच्या सुमारे ३५० कोटी रुपयांचे आहे. याचा पुढील तपास केला जात आहे.
- अभिनेत्री तापसी पन्नू हिच्याकडून ५ कोटी रुपयांचे नगद व्यवहाराच्या पावत्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.
- अनुराग कश्यपच्या चौकशीत आयकर विभागाला २० कोटी रुपयांपर्यंतचे कर चोरीचे पुरावे हाती मिळाले आहेत.
आतापर्यंतची कारवाई
- पुण्याच्या वेस्टिन हॉटेलमध्ये गुरुवारी आयटी टीमने अनुराग आणि तापसी यांची चौकशी केली. त्याच्या घर व कार्यालयातून ३ लॅपटॉप व ४ संगणक जप्त करण्यात आले आहेत. त्यांच्या दोन्ही व्हॉट्सअॅप चॅटचा बॅकअपही घेण्यात आला आहे.
- चौकशी होईपर्यंत वेगवेगळ्या लोकांच्या ७ बँक लॉकरच्या वापरावरही बंदी घालण्यात आली आहे.
- टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी क्वानची ४ खाती फ्रिज केली गेली आहेत.
राजकारणातून ईडीवर टीका
- प्राप्तिकराच्या या कारवाईबाबत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टोला लगावला आहे. राहुल यांनी सोशल मीडियावर लिहिले की, ‘उंगलियों पर नचाना- केंद्र सरकार IT Dept-ED-CBI के साथ ये करती है। भीगी बिल्ली बनना- केंद्र सरकार के सामने मित्र मीडिया। खिसियानी बिल्ली खंभा नोंचे- जैसे केंद्र सरकार किसान-समर्थकों पर रेड कराती है।’
- राहुल असे म्हणाले कारण तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप हे सरकारविरोधी आंदोलनाचे समर्थक आहेत. यापूर्वी तापसी यांनी शेतकरी आंदोलनास पाठिंबा दर्शविला होता. या आंदोलनावर पॉप स्टार रिहाना यांनी सोशल मीडियावर भाष्य केले तेव्हा त्याला प्रतिसाद म्हणून बॉलिवूड आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक व्यक्तींनी सरकारच्या बाजूने ट्विट केले होते. या सेलिब्रिटींच्या विरोधात तापसीने आपले मत व्यक्त केले होते. त्याचवेळी अनुराग कश्यप यांनी सीएएसारख्या मुद्द्यांवरून मोदी सरकारवर टीका केली होती.
- देशात आता लोकशाही संपुष्टात आली असून हुकूमशाही आली आहे. इथं आता राजे आणि नवाबांची हुकूमशाही अस्तित्वात आली आहे. राजाच्या विरोधात कुणी काही बोललं की त्याला तुरुंगात धाडण्यात येत , अशी टीका समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी केली आहे.
- राज्याचे कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही आयकर विभागाच्या धाडींवरुन केंद्रावर टीका केलीय. ” जे लोक केंद्र सरकारच्या धोरणांच्या विरोधात बोलत आहेत. लोकशाही वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच लोकांवर छापे टाकले जात आहेत”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप यांच्या घर व कार्यालयांवरील आयकर विभागाच्या छाप्यांवरुन राज्यात राजकारण सुरू झालं आहे. छापेमारीत मुंबई, पुणे, दिल्ली, हैदराबाद येथील घर आणि कार्यालयांचा समावेश होता . एकूण मिळून तब्बल २८ ठिकाणी छापे-धाडी करण्यात आली होती. यात मिळकत आणि शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर अफरातफर झाल्याचे पुरावे आयकर विभागाच्या हाती लागले आहेत. आयकर विभागाला या प्रकरणात एकूण मिळून ३७० कोटी रुपयांच्या कर चोरीची शंका आहे .