मुक्तपीठ टीम
“संशोधक, अभियंत्यांनी उपयोजित संशोधन व तंत्रज्ञानाच्या विकासावर भर द्यायला हवा. समाजाच्या, पर्यावरणाच्या आणि उद्योग क्षेत्राच्या समस्या सोडवण्यासाठी नवकल्पना, त्याची योग्य अंमलबजावणी व्हायला हवी. जागतिक स्तरावर विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानाचा, निर्माण होणाऱ्या संधींचा लाभ घ्यावा,” असे प्रतिपादन अमेरिकेतील व्हर्जिनिया टेक ऍडवान्सड रिसर्च इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. सैफुर रहमान यांनी केले.
होप फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर संचालित इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी (आयस्क्वेअरआयटी), इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिअरिंग (आयईईई) आणि पर्सिस्टंट सिस्टिम्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय पाचव्या आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलत होते. या परिषदेची संकल्पना ‘इन्फॉर्मेशन, इम्प्लीमेंटेशन अँड इनोव्हेशन इन टेक्नॉलॉजी’ अशी होती. परिषदेपूर्वी घेतलेल्या कार्यशाळेत संशोधक, विद्यार्थी, शिक्षक व भारत आणि विदेशातील प्रोफेशनल्स सहभागी झाले होते. पर्सिस्टंट सिस्टिम्स, प्रेमास टेक सिस्टिम्स, टीसीएस रिसर्च अँड स्नॅपर फ्युचर टेक आदी उद्योगातील तज्ज्ञांनी यामध्ये मार्गदर्शन केले.
आयस्क्वेअरआयटी’च्या मोहिनी छाब्रिया कॉन्व्हेंशन सेंटरमध्ये झालेल्या या परिषदेवेळी आयईईई पुणे विभागाचे प्रमुख गिरीश खिलारी, डॉ. राजेश इंगळे, डॉ. वर्षा देगांवकर, होप फाउंडेशन अँड रिसर्च सेंटरच्या अध्यक्षा अरुणा कटारा, व्यवस्थापकीय विश्वस्त अमृता कटारा, पर्सिस्टंट सिस्टिम्सचे डॉ. सुजय फडके, ‘आयस्क्वेअरआयटी’च्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील, कुलसचिव दिनेश जोजे आदी उपस्थित होते.
या परिषदेत संशोधक, अभियंते आणि अभ्यासकांना एकत्र आणण्यासाठी माहिती, अंमलबजावणी आणि तंत्रज्ञानविषयक नवकल्पनांच्या सर्व पैलूंचा समावेश आहे. प्राप्त झालेल्या एकूण २५० शोधनिबंधांपैकी ६० शोधनिबंध स्वीकारण्यात आले. ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेतील औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रातील सहा तज्ज्ञांचे बीजभाषण या परिषदेत झाले. कृत्रिम बुद्धिमत्ता, शाश्वत परिसंस्था, डेटा सायन्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज अँड रोबोटिक्स, कम्युनिकेशन सिग्नल प्रोसेसिंग, टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन अशा विषयांवर विचारमंथन झाले.
सैफुर रहमान म्हणाले, “भारतात ‘आयईईई’चे सर्वाधिक ६७००० सदस्य आहेत. २०२४ मध्ये होणाऱ्या ‘आयईईई’च्या शतक महोत्सवी सोहळ्यासाठी त्यांनी पुण्यातील सदस्यांना निमंत्रित केले. युवकांनी प्रश्न विचारावेत, मोठी स्वप्ने पाहावीत आणि व्यक्तिगत तसेच सामाजिक प्रगतीत योगदान द्यावे.”
होप फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्य व शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य केले जात असल्याचे अरुणा कटारा म्हणाल्या. महिला अभियंता व संशोधकांना प्रोत्साहन म्हणून श्री प्रल्हाद पी. छाब्रिया पुरस्कार दिला जातो, असे त्यांनी नमूद केले. गिरीश खिलारी यांनी ‘आईईई’च्या पुणे विभागाच्या कार्याबद्दल माहिती दिली.
डॉ. राजेश इंगळे यांनी परिषदेविषयी विस्तृत माहिती दिली. डॉ. सुजय फडके यांनी औद्योगिक व शैक्षणिक संबंध दृढ होण्याची गरज असल्याचे सांगितले. संयुक्त संशोधनासाठी शैक्षणिक संस्थांना निधी उपलब्ध करून द्यायला हवा, असेही ते म्हणाले.
अमृता कटारा यांनी आयस्क्वेअरआयटी तर्फे संशोधन, विकास, क्षमता बांधणी व मार्गदर्शन याबाबत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. डॉ. वैशाली पाटील यांनी स्वागत प्रास्ताविक केले. वैदेही बॅनर्जी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. वर्षा देगांवकर यांनी आभार मानले.