गुन्हे महत्त्वाचे : 1)नालासोपाऱ्यात एका रिक्षाचालकाची चाकूने हत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी तुळींज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास रिक्षा चालवीत असताना एका अज्ञात व्यक्तीने रिक्षा थांबविली. त्याने रिक्षाचालकाचा मोबाइल खेचला. यामध्ये झालेल्या झटापटीत त्याने रिक्षाचालकावर वार केला. 2)वसईतील रिक्षाचालकाच्या निर्घृण हत्येप्रकरणी मनोर पोलिसांनी पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. वसई येथील रिक्षाचालक पुंडलिक पाटील यांच्या हत्येप्रकरणी त्यांची पत्नी आणि तिच्या प्रियकराला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे आरोपी पत्नी आणि प्रियकर हे दोघंही पोलीस कॉन्स्टेबल असल्याचं उघड झालं आहे. 3)‘स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई, सुरक्षित मुंबई’ या शीर्षकांतर्गत मुंबई महानगरपालिकेने क्लीनअप मार्शल ही संकल्पना राबवायला सुरुवात केली होती. पण अगदी पहिल्या दिवसापासूनच क्लीनअप मार्शल वादात सापडू लागले. दंडाच्या नावाखाली क्लीनअप मार्शल मुंबईकरांकडून एक प्रकारे वसुलीच करु लागले होते. असाच एक गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अनिल अशोक तावडे या क्लीनअप मार्शलला अटकही केली आहे. 4)उस्मानाबाद शहरातील हनुमान चौक येथील एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिसाने बंदुकीचा धाक दाखवत बलात्कार केला असल्याचं या महिलेने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. याप्रकरणी पोलीस नाईक हरिभाऊ कोळेकर याच्यावर उस्मानाबाद शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 5)दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पोलिसांनी आज (बुधवार) जेरबंद केले. त्यांच्याकडून सुमारे आठ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींकडे विनापरवाना पिस्तुल, चार राऊंड, दोन तलवारी अशी शस्त्रे आढळली.