मुक्तपीठ टीम
कोकण सुजलाम् सुफलाम् झाला पाहिजे. तसेच पर्यटनाच्या दृष्टीने कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यशासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले.
कोकणाच्या भूमीतील पारंपरिक उद्योगांना ग्राहकमंच मिळवून देण्याकरिता मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को मैदान येथेआयोजित करण्यात आलेल्या ‘स्वराज्य भूमी कोकण’ महोत्सवास आज उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार प्रसाद लाड, आमदार प्रकाश सुर्वे, संजय यादवराव, राहुल तिवरेकर, किशोर धारिया, उद्योजक, नागरिक व सर्व संबंधित उपस्थित होते.
उद्योगमंत्री उदय सामंत पुढे म्हणाले, बारसु येथे होणारी रिफायनरी ही ग्रीन रिफायनरी असून या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहेत. याशिवाय हायड्रोजनवर चालणाऱ्या बोटीचा कारखाना सुरू करण्यासाठी लवकरच सामंजस्य करार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले .
कोकणाचा विकास करण्यासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) अंतर्गत संस्था पुढे आल्यास त्याचे स्वागत केले जाईल. चिपी विमानतळ, रत्नागिरी विमानतळ या सारखी विकासात्मक कामे सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला जात आहे, असेही उदय सामंत यावेळी म्हणाले.
ग्रामीण भागामध्ये शेती, आरोग्य, पाणी, ऊर्जा क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल रोटरी क्लब,टाटा कॅपिटल, ऑलकार्गो लॉजिस्टिक, संत निरंकारी संस्था,नाठाळ ग्रामस्थ ,पोसरे ग्रामस्थ,
ईगल फाऊंडेशन, डी डेकोर, सुदर्शन केमिकल्स, इ. संस्थांना यावेळी उद्योग मंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.