मुक्तपीठ टीम
विमानतळावरील प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी फेशियल रिकग्निशन टेक्नॉलॉजी (FRT) वर आधारित नवीन प्रणाली गुरुवारपासून दिल्ली, वाराणसी आणि बंगळुरू विमानतळांवर सुरू करण्यात आली आहे. यामध्ये प्रवाशाला त्याच्या चेहऱ्यावरून ओळखता येईल आणि डिजी-यात्रा मोबाईल अॅपद्वारे विमानतळांवर पेपरलेस एन्ट्री करता येणार आहे. त्यांच्या प्रवासाच्या डेटावर, चेहऱ्याच्या ओळखीद्वारे सुरक्षा तपासणी आणि इतर चेक पॉइंट्सवर आपोआप प्रक्रिया केली जाईल.
आता चेहरा असेल बोर्डिंग पास… ‘डिजी-यात्रा’ अॅप लाँच
- दिल्ली, वाराणसी आणि बंगळुरू विमानतळांवर देशांतर्गत प्रवाशांसाठी गुरुवारपासून फेशियल रिकग्निशन टेक्नॉलॉजी (FRT) वर आधारित नवीन प्रणाली सुरू करण्यात आली.
- यामध्ये प्रवाशाला त्याच्या चेहऱ्यावरून ओळखता येईल आणि डिजी-यात्रा मोबाईल अॅपद्वारे विमानतळांवर पेपरलेस एन्ट्री करता येणार आहे.
- केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (IGIA) टर्मिनल-3 साठी डिजी-यात्रेचा औपचारिक शुभारंभ केला.
- हे मार्च २०२३ पासून हैदराबाद, कोलकाता, पुणे आणि विजयवाडा येथे देखील लाँच केले जाईल.
- हे तंत्रज्ञान देशभरातील विमानतळांवर सुरू होईल.
- या नवीन प्रणालीसाठी बनवलेल्या डिजी-यात्रा मोबाइल अॅपची बीटा आवृत्ती १५ ऑगस्ट रोजी दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने लाँच केली.
- अॅपची नोडल एजन्सी डिजी-यात्रा फाउंडेशन, एक विना-नफा संस्था आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) तसेच कोचीन, बंगलोर, दिल्ली, हैदराबाद आणि मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळ लि. यांची भागीदारी आहे.
प्रवाशांचा डेटा एन्क्रिप्ट असणार…
- डिजी-यात्रा अॅपमध्ये, प्रवाशांचा वैयक्तिकरित्या ओळखण्यायोग्य डेटा केंद्रीकृत प्रणालीमध्ये संग्रहित केला जाणार नाही.
- ओळखपत्र आणि प्रवासाचा तपशील प्रवाशाच्या फोनमध्येच सुरक्षित वॉलेटमध्ये ठेवला जाईल.
- अॅपमध्ये प्रवाशांचा डेटा एन्क्रिप्ट केला जाईल.
- यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.
- प्रवाशांचा डेटा विमानतळाच्या २४ तास अगोदर सामायिक केला जाईल.
- प्रवास पूर्ण झाल्यानंतर २४ तासांच्या आत विमानतळ सर्व्हरवरून तो अनिवार्यपणे हटवला जाईल.
याचा वापर कसा करता येणार?
- प्रवाशाला डिजी-यात्रा मोबाईल अॅपवर आधार कार्ड पडताळणी आणि फोटो अपलोड करावा लागेल.
- बोर्डिंग पास अॅपवरच स्कॅन करावा लागेल.
- ही माहिती विमानतळाला दिली जाईल.
- बोर्डिंग पासचा बारकोड विमानतळांच्या ई-गेटवर स्कॅन केला जाईल.
- येथे एफआरटी बसवण्यात येणार आहे.
- त्यात प्रवाशाची ओळख आणि प्रवासाची कागदपत्रे चेहऱ्यावरून पडताळली जातील.
- प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना ई-गेटद्वारे विमानतळावर प्रवेश करता येणार आहे.
- त्यांना विमानात चढताना सुरक्षा तपासणी आणि नेहमीच्या प्रक्रियेतून जावे लागेल.
९ मिनिटांत विमानात बसले प्रवासी!
- दुबई, सिंगापूर, अटलांटा यासह जपानच्या नारिता विमानतळांवर FRT तंत्रज्ञानामुळे प्रवाशांचा वेळ वाचत असल्याची माहिती सिंधिया यांनी दिली.
- अटलांटा विमानतळावर, ९ मिनिटांत सर्व प्रवासी विमानात चढण्याचा दावा केला जात आहे.