मुक्तपीठ टीम
पाकिस्तानवर १९७१च्या युद्धात मिळवलेला ऐतिहासिक विजय साजरा करण्यासाठी लष्कराच्या दक्षिण कमांड मुख्यालयाने १६ डिसेंबर २०२२ या विजय दिन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवशी सदर्न स्टार विजय दौड -२२ ही धावस्पर्धी आयोजित केली आहे. दक्षिण कमांडच्या अखत्यारीत येणाऱ्या पुणे तसंच इतर पंधरा प्रमुख शहरांमध्ये या धावस्पर्धेला हिरवा झेंडा दाखवला जाईल. ‘सैनिकांसाठी धावा – सैनिकांबरोबर धावा” या संकल्पनेवर आधारित असलेले हे भव्य आयोजन भारतीय लष्कर आणि जनता, खास करून युवावर्ग यांच्यामधील धागा दृढ करण्यासाठी आहे. शहीदांना आदरांजली वाहण्यासोबतच विजय दौड-२२ मधील सहभागी आपल्या देशातील धैर्य, क्षमता आणि उत्साहाचे दर्शन घडवतील. देशसेवेसाठी सर्वोच्च त्याग केलेल्या शूर सैनिकांना आदरांजली देण्यासाठी या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. एकाच वेळी विविध ठिकाणी म्हणजेच पुणे, सिकंदराबाद, चेन्नई, बंगळुरू, जोधपुर, जैसलमेर आणि इतर मुख्य शहरांमध्ये एकाच वेळी होत असलेल्या या कार्यक्रमाला समाजातील सर्व स्तरातील जनतेला उपस्थित राहण्याचे आमंत्रण आहे. या समारंभात शहिदांना पुष्पचक्र अर्पण करण्याचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर सर्व निवडक ठिकाणी विजय दौड-२२ ला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं जाईल.
पुणे येथे १६ डिसेंबर २०२२ रोजी विजय दौड २२ ला आरंभ होईल. दक्षिण कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्टनंट जनरल ए.के. सिंग (अति विशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक, सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक) हे सकाळी सात वाजता दक्षिण कमांड युद्ध स्मृती स्थळी पुष्पचक्र अर्पण करण्याचा कार्यक्रम करतील. त्यानंतर विजय दौड २०२२ ला पुणे येथे हिरवा झेंडा दाखवून रवाना केले जाईल. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून समाजातील प्रत्येक स्तरातील नागरिकांनी यात आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन भारतीय लष्कराने केले आहे. राष्ट्रीय छात्र सेना कॅडेट आणि इतर सर्व लोकांनी विजय दौड २०२२ मध्ये सहभागी होऊन विजय दिन २०२२ च्या विजय सोहळ्याचा भाग व्हावे असे आवाहन लष्कराने केले आहे.
विजय दौड- २२ ही ३ श्रेणीमध्ये घेतली जाणार आहे, त्यापैकी पुरुष आणि महिलांसाठी वेगवेगळी १२.५ किलोमीटर दौड असेल तर शालेय विद्यार्थ्यांसाठी 5 किलोमीटरची दौंड आणि फक्त महिलांसाठी असलेली ४ किलोमीटरचे दौड अशा तीन श्रेणीमध्ये विजय दौड २२चे आयोजन केले आहे. १२.५ किलोमीटरच्या श्रेणीसाठी एकूण ५० हजार रुपये तर शालेय विद्यार्थी तसेच महिलांसाठी असलेल्या श्रेणीसाठी प्रत्येकी २२ हजार रुपये अशी बक्षिसांची रक्कम असेल.
पुणे येथे होणाऱ्या दौड मध्ये भाग घेण्यासाठी विनामूल्य ऑनलाईन नोंदणी www.runbuddies.club या संकेतस्थळावर करता येईल. नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक १० डिसेंबर २०२२ आहे. सदर्न स्टार विजय दौड-२२ मध्ये सर्व नागरिकांचा मनापासून आणि उत्साहाने घेतलेला सहभाग हा त्यांचा देशभक्तीचा उत्साह आणि राष्ट्र उभारणीप्रती बांधिलकी यांचे दर्शन घडवून जाईल.