मुक्तपीठ टीम
“इंदिरा गांधींच्या सरकारमध्ये लागू झालेली आणीबाणी चुकीची होती,” असं त्यांचे नातू आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले. कॉर्नेल विद्यापीठाच्या कार्यक्रमात व्हर्च्युअल माध्यमातून संबोधित करताना ते म्हणाले, “आणीबाणी निश्चितपणे चुकीचीच होती. मात्र त्या काळी जे घडले आणि आज जे देशात होत आहे, या दोन्हींत मूलभूत फरक आहे.”
राहुल म्हणाले, “काँग्रेस भारताचा घटनात्मक पाया बळकावण्याचा प्रयत्न करत नाही. आमच्या पक्षाची मांडणी आम्हाला त्याची परवानगी देत नाही. अगदी कुणाची इच्छा असली तरीही आम्ही तसे करू शकत नाही.’
“आज प्रत्येक संस्थेवर एकाच विचारधारणेच्या लोकांचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न आहे.
काँग्रेसने कधीही मुलभूत आधार असलेल्या संस्थांचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला नाही. पण विद्यमान सरकार भारताच्या लोकशाही व्यवस्थेला नुकसान पोहोचवत आहे. प्रत्येक संस्थेच्या स्वायत्ततेवर हल्ला केला जातोय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रत्येक ठिकाणी घुसखोरी करत आहे. न्यायव्यवस्था, निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त यंत्रणांवरही एका विचारधारेचा पगडा आहे. माध्यमांपासून ते न्यायालयापर्यंत सर्वांना लक्ष्य केलं जात आहे”, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
“संसदेत चर्चेवेळी माइक बंद केला जातो. आम्हाला संसदेत बोलू दिले जात नाही. लोकशाहीवर मोठा हल्ला होतोय. मणिपूरमध्ये राज्यपाल भाजपची मदत करत आहेत. पुदुच्चेरीत राज्यपालांनी अनेक विधेयकं मंजूर होऊ दिली नाहीत. कारण ती आरएसएसशी संबंधित होती. भारतात आता हुकूमशाही सुरू आहे,” असा आरोप त्यांनी केला.
“अंतर्गत लोकशाहीवर भाजपला कोणी प्रश्न विचारत नाही. मी पहिला माणूस असे म्हटले होते की पक्षात लोकशाही, त्यासाठी निवडणुका खूप महत्वाच्या आहेत, परंतु गंमतीची गोष्ट म्हणजे हे प्रश्न इतर कोणत्याही पक्षाने विचारले नाहीत. कुणी भाजप, बसप व सपातील अंतर्गत लोकशाहीवर प्रश्न विचारत नाही.”
माझ्याच पक्षाच्या लोकांनी माझ्यावर टीका केली
ते म्हणाले, “मी युवक काँग्रेस आणि एनएसयूआयच्या निवडणुकांवर भर दिला होता. मात्र माझ्याच पक्षाच्या लोकांनी माझ्यावर टीका केली. पक्षात निवडणुकीचा मुद्दा काढला तर स्वकियांनीच घेरले.”