मुक्तपीठ टीम
पहिल्या ‘पुणे ज्वेलर्स प्रीमियर लीग २०२२’ क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद दिलीप सोनिगरा रॉयल्सने पटकावले. नगरकर सुपरकिंग्सवर ८ गडी राखून रॉयल्सने दणदणीत विजय मिळवला आणि सुवर्ण करंडकावर आपले नाव कोरले. सलामीवीर वीरेन पालेशाची २३ चेंडूत नाबाद ३५ धावांची धडाकेबाज खेळी आणि कर्णधार केतन परमारची १३ चेंडूत १६ धावांची मिळालेली साथ दिलीप सोनिगरा रॉयल्सच्या विजयात महत्वाची ठरली. सामनावीर व मालिकावीराचा किताब केतन परमारने पटकावला. विजेत्यांना १ लाख ५१ हजार, तर उपविजेत्याना ७५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक मिळाले.
महिला गटात दर्शना शाँडच्या नेतृत्वाखाली गांधी रॉयल एंजेल्सने पुष्पम पलटन्सवर ३१ धावांनी मात करीत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. विजेत्यांना प्रथम फलंदाजी करताना एंजेल्सने ६ षटकांत ४ गडी गमावून ७८ धावा केल्या. ७९ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या पलटन्सला केवळ ४७ धावा करता आल्या. ३९ धावा करणारी साक्षी पुनमीया सामनावीर ठरली. महिला गटात विजेत्यांना २१ हजार, तर उपविजेत्याना ११ हजारांचे रोख पारितोषिक मिळाले.
नगरकर सुपरकिंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, पहिल्याच षटकात सलामीवीर भाविक लोढा अवघ्या दोन धावा काढून झेलबाद झाला. यश सोनिगरा १४ (१० चेंडूत), निखिल लुंकड १६ (२० चेंडूत) आणि यश सोनिग्रा १८ (१६ चेंडूत) यांचा अपवाद वगळता इतर खेळाडूंना चांगली फलंदाजी करता आली. कर्णधार चेतन परमार अवघी एक धाव काढून बाद झाला. निर्धारित १० षटकांत सुपरकिंग्जला ६ गडी गमावत ६१ धावा करता आल्या. रॉयल्सकडून मनोज मेहता व केतन परमार यांनी प्रत्येकी दोन, तर वेतन शहा याने एक बळी घेतला.
विजयासाठी ६२ धावांचे लक्ष्य घेऊन आत्मविश्वासाने मैदानात उतरलेल्या रॉयल्सची सुरुवातही चांगली झाली नाही. सलामीवीर परेश ६ चेंडू खेळून शून्यावर बाद झाला. वीरेन पालेशा नाबाद ३५ (२३ चेंडू) व केतन परमारने १६ (१३ चेंडूत) सुपरकिंग्जच्या गोलंदाजांवर तुटून पडत जोरदार फटकेबाजी केली. पालेशाने तीन चौकार व एक षटकार लगावला. सुपरकिंग्जकडून केवळ यश सोनिगराने दोन बळी मिळवले.
पुणे सराफ असोसिएशनच्या ९८ व्या वर्धापन दिनानिमित्त सहकारनगर येथील शिंदे हायस्कुलच्या क्रिकेट मैदानावर आयोजिलेल्या क्रिकेट स्पर्धेचे पारितोषिक वितरण माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाले. यावेळी स्थानिक नगरसेवक महेश वाबळे, असोसिएशनचे अध्यक्ष फतेचंद रांका, सचिव अमृत सोलंकी, खजिनदार कुमारपाल सोळंकी, उपसचिव राजेंद्र वायकर, स्पर्धेचे संयोजक अंकित शाँड, अभिषेक मुथा, कुणाल सिरोया, विपुल अष्टेकर आदी उपस्थित होते.
मुरलीधर मोहोळ म्हणाले, “क्रिकेटसारख्या खेळामुळे परस्परांतील नातेबंध अधिक दृढ होतात. आपल्यातील एकी वाढते. सराफ असोसिएशनने आयोजिलेल्या या स्पर्धेमुळे पुण्यातील सर्व सराफ व्यावसायिक एकत्र येऊन खेळले. खेळामुळे आपले आरोग्य व सामाजिक भान चांगले होते.”
फतेचंद रांका म्हणाले, “पहिल्यांदाच अशी स्पर्धा घेतली. तरुणांचा उत्साह प्रेरक होता. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ३४ सामने झाले. सराफांची मुले व मुली यामध्ये खेळल्या. खेळाचे महत्व मुलांमध्ये रुजले असून, असोसिएशन शतकाकडे वाटचाल करत असल्याने यापुढे आणखी मोठ्या प्रमाणात स्पर्धेचे आयोजन करू.”