मुक्तपीठ टीम
केंद्र सरकारने प्रत्येक महिन्याला १५ ते १६ लाख नोकऱ्यांची भरती काढणार असल्याचा दावा केला आहे. राजस्थानमधील अजमेर येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाने आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्याला संबोधित करताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी हा दावा केला. संपूर्ण जगात आर्थिक संकटाची परिस्थिती आहे. अशा परिस्थितीतही भारत हा एक ऊर्जास्रोत म्हणून उदयास आला आहे. मोदी सरकारच्या योजनांमुळे प्रत्येक वर्गाचे जीवन सोपे झाले आहे, असे ते म्हणाले.
‘नेशन फर्स्ट’चे तरुणांना आवाहन…
- रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तरुणांना ‘नेशन फर्स्ट, ऑलवेज फर्स्ट’ हा मंत्र अंगीकारण्याचे आवाहन केले आहे.
- ते म्हणाले की, जीवनात त्यांनाच विजय मिळतो.
- ज्या लोकांनी नेहमीच आपल्या कर्तव्यात राष्ट्राला प्रथम स्थान दिले आहे.
- तरुणांसमोरील आव्हानांचा संदर्भ देत वैष्णव म्हणाले की, “जर तरुणांनी फक्त एकच गोष्ट, एकच मंत्र लक्षात ठेवला तर त्यांच्या मनात कधीही शंका येणार नाही.
- यावेळी रोजगार मेळाव्यात नोकरी मिळालेल्या अनेकांना नियुक्ती पत्रांचे वाटपही करण्यात आले.
७१ हजाराहून अधिक तरुणांना नियुक्ती पत्राचे वाटप!!
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पंतप्रधान रोजगार मेळाव्याअंतर्गत ७१,००० हून अधिक तरुणांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नियुक्ती पत्र देण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात केली.
- मोदी म्हणाले होते की, गेल्या एका महिन्यात विविध प्रदेशांमध्ये अशाच प्रकारच्या मोहिमा राबवण्यात आल्या आहेत.
- आदर्श आचारसंहिता लागू असलेल्या गुजरात आणि हिमाचल प्रदेश वगळता देशभरात ४५ ठिकाणी केंद्र सरकारच्या नुकत्याच झालेल्या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्रांच्या भौतिक प्रती देण्यात आल्या.