मुक्तपीठ टीम
गोंदिया जिल्ह्याचे वैभव आणि निसर्ग सौंदर्याचे प्रतिक असलेल्या सारस पक्षाच्या संवर्धनासाठी आणि त्यांच्यासाठी घरटे बांधणाऱ्या “सारस मित्रांना” प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या वन विभागाने पुढाकार घेतला आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या संदर्भात बैठक घेवून पक्षाचे संवर्धन करणाऱ्या शेतमालाच्या प्रोत्साहनात्मक बक्षिसाकरिता तरतूद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय व्याघ्र प्रकल्पाच्या नियामक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
गोंदिया जिल्ह्यातील व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानच्या सन २०२२-२०२३ च्या अर्थसंकल्पात खासगी जमिनीवर सारस पक्षांना घरटे बांधल्यावर घरट्यांचे व पक्ष्यांचे संवर्धन करणाऱ्यास प्रोत्साहानात्मक रक्कम देण्याची तरतूद करण्यात आली होती. सारस पक्षाचे घरटे असलेल्या शेत मालकास व लागून भातशेती करणाऱ्या शेतमालकांना दर वर्षी किमान १० हजार रुपये प्रोत्साहानात्मक रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.
सारस पक्ष्यांचा विणीचा हंगाम संपून सारस पक्षी पिलांना दुसरीकडे घेवून जाईपर्यंत शेतमालकाने सारसपक्षांना संरक्षण देण्यात यावे ; याबाबत पाहणीनंतर खात्री झाल्यावर ही रक्कम देण्यात येईल. गोंदिया जिल्ह्यातील वाघ नदी तसेच गोंदिया व भंडारा जिल्ह्याच्या सिमेवरुन वाहणाऱ्या वैनगंगा नदीचे खोरे व त्यालगत असलेल्या भाताच्या शेतीत तसेच तलावामध्ये सारस पक्ष्यांचे अस्तित्व आहे. सारस हा स्थानिक स्थलांतर करणारा पक्षी असून दलदल व पानस्थळ पर्यावरण हा त्याचा मुख्य अधिवास आहे. हा पक्षी या दोन जिल्ह्यावरील भूभाग तसेच मध्यप्रदेश मधील बालाघाट परिसरात आढळतो. सारस पक्षी गोंदिया जिल्ह्याचे वैभव व सौंदर्याचे प्रतिक आहे. सारस पक्ष्यांचे संरक्षण व संवर्धनकरिता शेतकरी, पक्षी प्रेमी, विद्यार्थी यांच्यासह वनविभाग प्रयत्न करीत आहे. अनुकूल असलेल्या क्षेत्रातच सारस पक्ष्यांचे अस्तित्व मर्यादित राहिले आहे. हा सर्वभक्षी पक्षी असून किडे, कीटक, धान्य, गवताचे वीज, सरपटणारे प्राणी हे त्याचे मुख्य अन्न आहे. या निर्णयांमुळे नैसर्गिक साधनसंपत्ती व जैव विविधतेने समृद्ध असलेल्या गोंदिया जिल्ह्यात सारस पक्षांचे व त्यांच्या घरट्यांचे संवर्धन होणार असून निसर्ग प्रेमी व पक्षीप्रेमींना दिलासा मिळाला आहे.