मुक्तपीठ टीम
पत्नी परपुरुषाच्या घरी वारंवार राहणे पतीसाठी मानसिक आघात आहे, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदवले. संबंधित पतीला कुटुंब न्यायालयातून मिळालेला घटस्फोट कायम ठेवला.
नागपूर येथील सुरेखा व नामदेव यांचे २४ मे १९८४ रोजी लग्न झाले होते. त्यांना दोन मुली व एक मुलगा आहे. २००६ पर्यंत त्यांचा संसार आनंदात होता. सुरेखाची आई नागपुरात आल्यानंतर त्यांचा संसाराची गाडी बिघडली. तिची आई एका पोलीस अधिकाऱ्याकडे घरकामाची नोकरी करत होती. व ती तिथेच राहत होती. तेव्हा सुरेखा आईला भेटण्यासाठी जात होती. सुरुवातीला त्यावर नामदेवचा काहीच आक्षेप नव्हता; परंतु काही दिवसांनी सुरेखाचे त्या पोलीस अधिकाऱ्याकडे वारंवार जाणे व त्याच्या घरी रात्रभर मुक्काम करणे वाढत गेले. त्यामुळे नामदेवची चिंता वाढली. त्याने तिला समजावण्याचा भरपूर प्रयत्न केला; पंरतु ती थांबली नाही ती अनेक बहाणे बनवत आणि लपवाछपवी करत पोलीस अधिकाऱ्याच्या घरी जात होती. तेथे मुक्काम करीत होती. नामदेवने विचारल्यानंतर त्याला ती उत्तर देत नव्हती. नामदेवने जाब विचारणे वाढवल्यानंतर सुरेखाने त्याच्याविरुद्ध ११ मे २००७ रोजी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. तेव्हापासून दोघेही वेगळे राहायला लागले.
परिणामी, नामदेवने घटस्फोट मिळवण्यासाठी कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली. कुटुंब न्यायालयाने ती याचिका मंजूर केल्यामुळे सुरेखाने उच्च न्यायालयात अपील दाखल केले असता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व नितीन सूर्यवंशी यांनी रेकॉर्डवरील पुरावे लक्षात घेता सदर निरीक्षण नोंदवून तिचे अपील फेटाळून लावले .
नामदेवची बाजू दोन्ही मुलींनी घेतली. नामदेवने सुरेखावर केलेले आरोप खरे असल्याचे मुलींनी सांगितले. त्यामुळे नामदेवच्या याचिकेला बळ मिळाले. सुरेखाची कृती क्रूरतापूर्ण आहे. तिचे संबंधित वागणे सामान्य स्वरूपाच्या वागण्यामध्ये मोडत नाही, असेही उच्च न्यायालयाने निर्णयात नमूद केले .