मुक्तपीठ टीम
महाराष्ट्राचे सांस्कतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार ब्रिटनमधून पुन्हा महाराष्ट्रात आणण्याची घोषणा केली. त्यानंतर शिवप्रेमींमध्ये महाराजांच्या तलवारींविषयी चर्चा सुरु झाली आहे. पण असं पहिल्यांदाच घडत नाही आहे. याआधी बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांनी मुख्यमंत्रीपदी असताना १९८०-८१च्या दरम्यान महाराजांची भवानी तलवार ब्रिटनमधून परत आणण्यासाठीही प्रयत्न केले होते. त्यासाठी ब्रिटनच्या राणींशी भेटही ठरली होती. पण अंतुलेंचं पद गेलं आणि महाराजांच्या तलवारीचा विषयही मागे पडला. पुढे तर भवानी तलवार नेमकी कुठे, याविषयीही प्रश्न निर्माण झाला.
शिवाजी महारांजांची जगदंबा तलवार महाराष्ट्रात आणणार!!
- भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाले आहेत.
- त्यामुळं ‘जगदंबा तलवार’ पुन्हा भारतात आणण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
- सध्या ही तलवार ब्रिटनच्या राणीच्या संग्रहालयात आहे.
- सुधीर मुनगंटीवार यांनी २०२४पर्यंत शिवरायांची तलवार महाराष्ट्रात परत आणण्यासाठी पाठपुरावा करु,’ असे सांगितले आहे.
- ते म्हणाले की, ऋषी सुनक पंतप्रधान झाले आहेत. ज्यांचा भारताशी संबंध आहे. मी क्रेंद्र सरकारला विनंती केली आहे. तसंच, मी सुनक यांनाही पत्रव्यवहार करणार आहे.
ए. आर. अंतुलेंनीही केले होते तलवारीसाठी प्रयत्न…
- १९८०मध्ये सध्याचा रायगड आणि तेव्हाच्या कुलाबा जिल्ह्यातून निवडून आलेले अब्दुल रहमान अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. छत्रपती शिवाजी महाराजांवर निस्सीम प्रेम असणाऱ्या अंतुलेंनी कुलाब्याचं नाव बदलून रायगड केलं. त्यांनी महाराजांची भवानी तलवार इंग्लंडमध्ये असल्याचे कळताच ती परत आणण्यासाठीही प्रयत्न केले.
- छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार महाराष्ट्रात परत आणण्यासाठी अंतुलेंनी ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांच्याशी बोलणी सुरू केली होती. त्यांची राणींशी बैठकही ठरली होती. पण, तलवार परत आणण्याची चर्चा होण्यापूर्वीच घात झाला. बॅरिस्टर अंतुलेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांच्यानंतर मुख्यमंत्रीपदी बाबासाहेब भोसले यांची निवड झाली. पण त्यांनी ब्रिटनच्या राणीशी चर्चा करण्यासाठी पुढची पाववलं उचललीच नाहीत.
- त्यावेळी बॅरिस्टर अंतुलेंनी मुख्यमंत्री म्हणून ब्रिटनच्या राणीशी चर्चा केली असती, तर तलवारींचं नेमकं वास्तव समोर आलं असतं. त्या भारतात आणण्यासाठी काही तरी प्रक्रिया झाली असती. कदाचित आतापर्यंत त्या तलवारींपैकी एक तरी तलवार भारतात परत आली असती!
…भवानी तलवार आहे कुठे?
- अंतुलेंनी त्या काळात महाराजांच्या तलवारींसाठी प्रयत्न केले असले तरी त्यावेळी चर्चेत असणारी भवानी तलवार ब्रिटनमध्ये नाहीच, असंही पुढे उघड झालं.
- राजपुत्र प्रिन्स ऑफ वेल्स सातवे एडवर्ड हे १८७५मध्ये भारत भेटीवर आले होते. तेव्हा कोल्हापूरच्या शाहू छत्रपतींनी त्यांना तुळजा आणि जगदंबा तलवारी भेट दिल्या होत्या. त्या तलवारीच त्या देशात असल्याचे सांगण्यात येते. त्यापैकीच जगदंबा तलवार परत आणण्याची घोषणा आता सुधीरभाऊ मुनगंटीवारांनी केली आहे.