मुक्तपीठ टीम
गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी रणशिंग फुंकलं आहे. भाजपा, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष पूर्ण ताकदीने निवडणूक प्रचारात गुंतले आहेत. एकीकडे गुजरातमधील २७ वर्षांपासून असलेली आपली सत्ता टिकवण्यासाठी भाजपा जोरदार प्रयत्न करत आहे. तर त्याचवेळी गुजरातमधून एक मोठी बातमी आली आहे. गुजरातमध्ये एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जाणारे माजी पोलीस अधिकारी डीजी वंजारा यांनी ‘प्रजा विजय पक्ष’ स्थापन करून थेट राजकारणात प्रवेश केला आहे. या निवडणुकीत त्यांचा पक्ष उमेदवार मैदानात उतरवणार आहे. सर्वात महत्वाची माहिती अशी की, वंजारा यांचे ते ज्या भाजपाविरोधात मैदानात उतरत आहेत, त्याच भाजपाचे सर्वोच्च नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी ते राज्यात होते, तेव्हा थेट कनेक्शन होते. तरीही ते का त्यांच्याविरोधात राजकारण करत आहेत, हा खरा मुद्दा आहे.
वंजारांचा नवा पक्ष कशासाठी?
- माजी आयपीएस अधिकारी डीजी वंजारा यांनी सांगितले की, गुजरातमध्ये एक नवीन राजकीय पर्याय उदयास येणार आहे, जो या निवडणूकीत जिंकेल आणि लोकशाही प्रस्थापित करेल.
- मुस्लिम, ख्रिश्चन आणि ज्यूंच्या देशांमध्ये राज्य आणि धर्म सक्रिय आहे, मग भारतात का नाही, असेही ते म्हणाले.
याचे उत्तर गुजरातची जनताच देईल. - गुजरात नव्या आदर्शाचे पालन करेल.
- राजकारणासोबतच धर्माचे रक्षण करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
- हे लक्षात घेऊन आम्ही राजकीय पक्ष सुरू करत आहोत.
- खऱ्या लोकशाहीच्या उद्देशाने आपला पक्ष सत्ताधाऱ्यांच्या विरोधात उभा राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोण आहेत डीजी वंजारा?
- गुजरात केडरचे आयपीएस अधिकारी डीजी वंजारा यांची ओळख एन्काउंटर स्पेशालिस्ट अशी आहे.
- डीजी वंजारा २००२-०५ पर्यंत अहमदाबाद क्राइम ब्रँचचे डीसीपी होते आणि त्यांच्या पोस्टिंग दरम्यान सुमारे २० एन्काउंटर झाले होते.
- या सर्व चकमकी बनावट असल्याचे सीबीआयच्या तपासात उघड झाले आहे.
वंजारांसाठी २०१७नंतर संघर्षच…
- २००७ मध्ये केली होती डीजी वंजारा यांना अटक-
- गुजरातमधील सोहराबुद्दीन शेख आणि त्यांची पत्नी कौसर बी यांच्या बनावट चकमक प्रकरणात सहभाग असल्याच्या आरोपावरून डीजी वंजारा यांना एप्रिल २००७ मध्ये सीआयडी पथकाने प्रथम अटक केली होती.
- नंतर त्यांना इशरत जहाँ आणि इतर ३ जण आणि तुलसीराम प्रजापती यांच्या हत्येचा आरोपी बनवण्यात आला.
- वंजारा यांना २००७ मध्ये अटक केल्यानंतर साबरमती मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते.
- नोव्हेंबर २०१२ मध्ये, सोहराबुद्दीन प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने खटला चालवल्यानंतर त्यांना मुंबईतील तळोजा कारागृहात हलवण्यात आले.
- त्यानंतर जून २०१३ मध्ये सीबीआयने वंजारा यांना इशरत जहाँ प्रकरणात अटक करून पुन्हा साबरमती कारागृहात आणले.
- २००७ ते २०१४चा काळ हा वंजारांसाठी यातनांचा काळ होता, त्यावेळी गुजरातमध्ये भाजपाच्या नरेंद्र मोदींचीच सत्ता होती.
- मात्र, वंजारांना कोणतीही मदत मिळू शकली नाही.
- २०१४च्या मे महिन्यामध्ये केंद्रात भाजपा सत्तेत आली, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. परिस्थिती काहीशी बदलू लागली.
- सप्टेंबर २०१४ मध्ये त्यांना सोहराबुद्दीन प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.
- फेब्रुवारी २०१५ मध्ये सीबीआयच्या विशेष न्यायालयाने इशरत प्रकरणात त्यांना जामीन मंजूर केला होता.
- त्यानंतर, २०१७ मध्ये, वंजारा यांना सोहराबुद्दीन शेख प्रकरणात सर्व आरोपातून निर्दोष मुक्त करण्यात आले.
- मे २०१९ मध्ये सीबीआय कोर्टानेही इशरत जहाँ प्रकरणी त्यांची निर्दोष मुक्तता केली होती.
सततच्या संघर्षातून राजकारणाचा विचार!
या सर्व न्यायालयीन लढाया लढताना डीजी वंजारा यांना खूप त्रास सहन करावा लागला. पोलीस खात्यातील कारकीर्द संपलीच, पण त्यांना त्यांच्या कुटुंबालाही त्रास भोगावा लागला. त्यामुळेच ते गेली काही वर्षे अस्वस्थ होते. त्यातच त्यांना भाजपाच्या माध्यमातून राजकारण प्रवेशाचीही संधी मिळाली नाही. अखेर त्यांनी स्वत:चा पक्ष स्थापन करून आपलं अस्तित्व दाखवून देण्याचा प्रयत्न केला असल्याचं मानलं जातं. प्रश्न एवढाच की वादग्रस्त ठरलेल्या चकमकींमध्ये वंजारांचा निशाना अचूक लागत असे…राजकारणात ते लक्ष्यवेध करू शकतील?
पाहा: