क्रीडा थोडक्यात: १) भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिका पुण्यामध्ये खेळवण्यात येणार आहे. ही मालिका २३ मार्चपासून सुरु होणार आहे. सध्याच्या घडीला पुण्यामध्ये करोनाचे रुग्ण वाढत आहेत. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार या मालिकेत रोहित, रिषभ आणि वॉशिंग्टन सुंदर यांना खेळवण्यात येणार नसल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे भारतीय संघाला आता वनडे मालिकेतही मोठा धक्का बसू शकतो. २) भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने अजून एक रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. मात्र हा रेकॉर्ड मैदानावर नसून मैदानाबाहेर करण्यात आला आहे. इन्स्टाग्रामवर विराट कोहलीच्या फॉलोअर्सची संख्या १० कोटी झाली असून तो पहिलाच भारतीय आणि विशेष म्हणजे पहिलाच क्रिकेटर ठरला आहे. जगभरातील खेळाडूंच्या यादीत विराट कोहली चौथ्या स्थानावर आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डो, लियोनल मेस्सी आणि नेमार ज्युनिअर यांचीही नावे आहेत. तसेच १० क्रिकटर्समध्ये इन्स्टाग्रामवर प्रयोजित पोस्टच्या माध्यमातून कमाई करणारा विराट कोहली एकमेव क्रिकेटर आहे. ३) यश नाहर आणि अंकित बावणे यांच्या दमदार शतकी खेळीमुळे महाराष्ट्राने विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात पुदुचेरीवर १३७ धावांनी मात केली. मात्र या विजयानंतरही महाराष्ट्राला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागल्याने बाद फेरीत मजल मारण्याचे त्यांचे स्वप्न अधुरे राहिले आहे. ४) टोक्यो ऑलिम्पिकच्या दृष्टीने ही स्पर्धा महत्त्वाची असून महिला एकेरीत सिंधू आणि सायना यांच्यावर भारताची भिस्त आहे. सिंधूची पहिल्या फेरीत तुर्कीच्या नेसलिहान यिग्टशी गाठ पडणार आहे. सायनापुढे सलामीला कोरियाच्या संग जी ह्य़ुनचे आव्हान असेल. सिंधू आणि सायना या दोघींनीही अपेक्षेनुसार कामगिरी केली, तर उपांत्य फेरीत त्या एकमेकांविरुद्ध खेळताना दिसू शकतात. सिंधूने ऑलिम्पिक पात्रता मिळवली असली तरी सायनासाठी मात्र ही स्पर्धा महत्त्वाची आहे. ५) भारतामधील कसोटी मालिकेत इंग्लंडचा संघ आता १-२ अशा पिछाडीवर आहे. त्याचबरोबर फिरकी गोलंदाजीमध्ये इंग्लंडचा संघ लवकर बाद होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे इंग्लंडच्या संघाला आता मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. इंग्लंड क्रिकेट मंडळाने फलंदाजी प्रशिक्षकपदी माजी क्रिकेटपटू मार्कस ट्रेस्कॉटीकची निवड केली आहे. त्याचबरोबर आता इंग्लंड क्रिकेट मंडळाने वेगवान गोलंदाजी आणि फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकांचीही यावेळी नेमणूक केली आहे.