मुक्तपीठ टीम
केरळ हे एक सुशिक्षित राज्य. एक तर डाव्या विचारांच्या कम्युनिस्ट सत्तेचा लाल बावटा आपला म्हणणारं किंवा धर्मनिरपेक्षतेला आपलसं करणाऱ्या काँग्रेसच्या हाताला साथ देणारे. पण याच डाव्या पुरोगामी राज्यात आता भारतात कुठेही घडले नाही ते घडत आहे. एका उद्योगपती नेत्याचा कॉर्पोरेट पद्धतीने चालणारा पक्ष मूळ धरु लागला आहे.
लोकशाही पद्धतीने अस्तित्वात आलेले जगातील पहिले कम्युनिस्ट सरकार १९५७ मध्ये केरळमध्ये निवडले गेले. बुलेटऐवजी बॅलेट म्हणजे मतदानाने निवडले गेलेले ते पहिले डावे सरकार असावे. त्याच केरळमध्ये या विधानसभा निवडणुकीत कॉर्पोरेट राजकारणाचा पुढचा टप्पा सुरु होत आहे. याची सुरुवात ५ वर्षांपूर्वी झाली होती, जेव्हा २०१५, मध्ये प्रथमच कोचीपासून २५ किमी अंतरावर असलेल्या किझाकम्बलम पंचायतीच्या लोकांनी एलडीएफ आणि यूडीएफला दूर सारलं आणि एक नवीन प्रकारची ‘ट्वेंटी-ट्वेंटी’ ही राजकीय संघटना जिंकली. आता ही संघटना एक राजकीय पक्ष बनली असून या विधानसभा निवडणुकीत १० ते १४ जागा लढवण्याची तयारी केली आहे.
‘ट्वेंटी-ट्वेंटी’ ची पॉलिटिकल कहाणी २०१५ पासून सुरू होते, जेव्हा किझाकम्बलम पंचायतीच्या १९ वार्डपैकी १७मध्ये ‘ट्वेंटी-ट्वेंटी’ या नावाच्या गटाचे उमेदवार जिंकले.त्यांनी पंचायतीचा ताबा घेतला, पण एका दिवसात तसे झाले नव्हते. किटेक्स गारमेंट्स लिमिटेड नावाच्या कंपनीने या पंचायतीच्या माध्यमातून विकास कामांना सुरुवात केली होती. त्यांनी विकास व सार्वजनिक सुविधांशी संबंधित कामांवर भर दिला होता.
यानंतर २०१५ मध्ये पंचायत निवडणुका आल्या तेव्हा कंपनीने ट्वेंटी-ट्वेंटी नावाची एक राजकीय संस्था स्थापन केली आणि आपले उमेदवार उभे केले. या संघटनेने निवडणुकीत मोठा विजय मिळविला. उत्तर भारताच्या तुलनेत केरळमधील पंचायती आकाराने मोठ्या आहेत. एका पंचायतीत ४५ ते ७० हजार मतदार आहेत. किझाकम्बलम ही पंचायत न वाटता कोचीमधील ते एक मिनी शहर आहे असे वाटते.
सुपर मार्केट १३०० चौरस मीटर क्षेत्रावर पसरलेले आहे. बाजारात गर्दी पाहण्यास मिळते. मासे, कोंबडी, भाज्या आणि दुधापासून मसूर, तेल, मसाले या सर्व गोष्टी उपलब्ध आहेत. बाजारात खरेदी करताना फक्त रेशनकार्ड दाखवून फक्त अर्ध्या भावात कोणत्याही वस्तू मिळतात.
‘ट्वेंटी-ट्वेंटी’ने काय करून दाखवले आहे?
• गावातील रस्ते मजबूत आणि चांगल्या दर्जाचे आहेत
• गावा स्वच्छेतेची काळजी घेतली गेली आहे.
• ‘ट्वेंटी-ट्वेंटी’ ने गरिबांसाठी ३० ते ४० घरे मिळून गॉडस व्हिलाच्या नावाने चार वसाहती बनविल्या आहेत.
• या पंचायतीच्या विभागातही अंगणवाडी केंद्रे व शाळा आहेत
ट्वेंटी-ट्वेंटीच्या कॉर्पोरेट पॉलिटिक्समागील डोके
• ट्वेंटी-ट्वेंटीचे संस्थापक किटेक्स गारमेंट्स लिमिटेड आणि अण्णा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक साबू एम. जेकब हे २०-२०च्या राजकीय प्रयोगामागील डोके आहे.
• जेकब हे दरवर्षी हुरुन लिस्ट ऑफ बिलेनियर या यादीत असतात.
• सध्या त्यांच्या कंपनीत १२,५००पेक्षा जास्त कर्मचारी आहेत.
• कंपनीची वार्षिक उलाढाल १००० कोटी रुपये आहे.
‘ट्वेंटी-ट्वेंटी’च्या कारभारातील वेगळंपण
• या पंचायतीत पूर्वीच्या कामांमध्ये अधिकारी, राजकारणी, कंत्राटदार यांच्यात ६०% रक्कम वाटली जात होती.
• यापूर्वी फक्त ४०% रक्कम वापरली गेली होती
• परंतु गेल्या ४-५ वर्षांत ‘ट्वेंटी-ट्वेंटी’ने व्यवस्थित नियोजनबद्ध काम केले आहे त्यामुळे १००% पैशांचा उपयोग झाला.
• यात प्रथम लोकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, चांगले रस्ते, शिक्षण इत्यादी मूलभूत गरजा भागविण्यास प्राधान्य देण्यात आले.
‘ट्वेंटी-ट्वेंटी’चा फ्यूचर प्लान
• दुसर्या टप्प्यात शॉपिंग मॉल्स, जलतरण तलाव, आरोग्य केंद्रे, महसूल टॉवर्स, सिनेमा इत्यादी लोकांच्या लक्झरी सुविधांच्या तरतुदीवर भर देण्यात येणार आहे.
• ‘सार्वजनिक सुविधांशी संबंधित प्रत्येक गोष्ट येत्या १० वर्षात तेथे उभारण्याचा प्रयत्न असेल. त्यानंतर पायाभूत सुविधा विकास कामांसाठी वेगळे पैसे खर्च करण्याची गरज भासणार नाही.
नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ‘ट्वेंटी-ट्वेंटी’ने आसपासच्या परिसरातील इतर चार पंचायत निवडणुका लढवल्या. यापैकी ३ पंचायतींमध्ये ‘ट्वेंटी-ट्वेंटी’ला मोठा विजय मिळाला. एकामध्ये, ‘ट्वेंटी-ट्वेंटी’ केवळ ८ जागा जिंकू शकली, परंतु तेथे त्यांनी सर्व जागा लढवल्या नव्हत्या.
‘ट्वेंटी-ट्वेंटी’चे उमेदवार कसे निवडतात?
• ‘ट्वेंटी-ट्वेंटी’चे सर्व उमेदवार सुशिक्षित असतात.
• ६५% पदव्युत्तर पदवीधर
• ३०% पदवीधर
• ५% लोक डिप्लोमा धारक
• ट्वेंटी-ट्वेंटी’ची वॉर्ड समिती उमेदवार निवडते
पाहा व्हिडीओ: