मुक्तपीठ टीम
दिवाळी म्हणजे प्रकाशोत्सव, सगळीकडे झगमगाट…दिव्यांची आरस…एलईडी लाईटींगचा उजेड….मात्र हे सर्व असताना दिवाळीत सर्वांचे लक्ष वेधून घेतो तो म्हणजे आकाश कंदील. घरासमोर वेगवेगळ्या प्रकारचे आकाश कंदील लावले जातात. सोलापूरच्या आजी निलिमा महामुरे यांनी देखील या दिवाळी पर्यावरण पुरक असा आकाश कंदील बनवला आहे.
सोलापूरच्या ६८ वर्षीय निलिमा महामुरे या आजींनी उत्साह आणि आनंदाने या वर्षीचा आकाश कंदील घरीच स्वतः तयार केला. विशेष म्हणजे हा आकाश कंदील पर्यावरण पुरक आहे. आकाश कंदील बनवताना प्लास्टिक किंवा थर्माकोलचा वापर केला नाही. बाजारात मिळणारे आकाश कंदील हे बहुतेक प्लास्टिक पासून बनवलेले असतात. त्याचबरोबर सध्या मध्यमवर्गीय कुटुंबांची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच. अशात वय वर्षे अधिक असले तरीही आपण नवीन काहीही करू शकतो. या जाणीवेतून स्वतः ची करमणूक, पर्यावरणाचा आणि निसर्गातील प्रत्येकांची काळजी घेत दिवाळी आनंदाने साजरी करावी या उद्देशाने हा आकाश कंदील बनवण्यात आले.
आजीने कसे बनवले कंदील?
- आजी यांनी वृत्तपत्रात येणाऱ्या कंदीलांचे फोटो आणि त्यांच्या नाती मृणाल आणि स्वरा यांची मदत घेत यु ट्यूब वरील अनेक व्हिडीओ पाहून आकाश कंदील तयार केले.
- दोन-तीन दिवसात आजींनी हा कंदील तयार केला आहे.
- कागद, कात्री, रंगीबेरंगी पतंगी कागद, डिंक, फेविकॉल यांची जुळवा जुळव केली.
- सुरुवात झाली, पट्टी आणि पेन्सिल चा वापर करून योग्य ते मापं घेऊन कागदावर अखणी करून हा कंदील तयार केला आहे.