मुक्तपीठ टीम
पूजा चव्हाण प्रकरणातील राजकीय गदारोळामुळे वनमंत्री पदाचा संजय राठोडांनी राजीनामा दिल्यानंतर आता एक पत्र चर्चेत आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: असं पत्र आल्याचे सांगितले. या पत्रात इतर मुद्दे मांडतानाच पूजाचे वडील लहू चव्हाण, आई मंदोदरी चव्हाण आणि बहिण दिव्याणी चव्हाण यांनी “आमची मुलगी गमावली परंतू या आड राजकारण करून दररोज होणारे आरोपाने तिचा रोज बळी जातोय.” अशी व्यथा मांडली आहे.
पूजाच्या कुटुंबीयांच्या त्या पत्रात असलेला मजकूर पुढील प्रमाणे आहे:
सन्माननीय मुख्यमंत्री महोदय,
महाराष्ट्र राज्य,
विषय- पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी होणारी आमची व आमच्या समाजाची बदनामी थांबवणे व्यक्त.
महोदय,
आमची मुलगी कु. पूजा चव्हाण हिचा दिनांक ७ फेब्रुवारी रोजी दुर्देवी मृत्यू झाला. कुठल्याही माता पितासाठी आपल्या पोटच्या गोळ्याचा मृत्यू हा अत्यंत वेदनादायी असतो, आमची ही वेदना आता कधीही भरून येणार नाही. मुलीच्या अकाली मृत्यूच्या दुःखापेक्षा अधिक त्रासदायक व आक्षेपार्ह्य म्हणजे माझ्या मुलीच्या मृत्यू संदर्भात जी चर्चा होत आहे. तिच्यावर खूप गलीच्छ आरोप लावून श्री. संजय राठोड राज्यमंत्री यांचे नाव घेऊन उलट सुलट बातम्या येत आहेत. जे निराधार आहेत. आपण यासंबंधी पोलीस चौकशीचे आदेश दिले आहेत, आपल्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. या घटनेचा तपास वेगाने व्हावा. जे दोषी असतील त्यांचावर आपण निश्चितच कारवाई करतील याची खात्री आहे. आमच्या मुलीचा बळी गेला पण फक्त संशयावरून कोणाचा ही बळी जाऊ नये. श्री. संजय राठोड यांच्या राजीनाम्याची कोणतीही मागणी आम्ही केली नाही. आमची मुलगी गमावली परंतू या आड राजकारण करून दररोज होणारे आरोपाने तिचा रोज बळी जातोय. याचे राजकारण करून श्री. संजय राठोड यांना आरोपी ठरवून राजीनामा घेवू नका.
तापासामध्ये श्री. राठोड किंवा अन्य कोणीही दोषी असल्यास कठोर कारवाई करून न्याय द्यावा. परंतु संशयावरून मुलीवर किंवा कोणावरही आरोप करू नये. श्री. संजय राठोड हे समाजाचे नेते आहेत ते खूप कष्ट करून येथ पर्यंत पोहचले आहेत फक्त संशयावरून त्यांच्या ही बळी घेऊ नये. तपासपूर्ण झाल्यावर दोषीवर कारवाई करावी. राजकारणामुळे व दबावामुळे घाईत निर्णय घेऊ नये. आपल्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. आपण आम्हाला न्याय द्याल.
आपले नम्र
लहु चंद्र चव्हाण (वडील)
मंदोधरी लहु चव्हाण (आई)
दिव्याणी लहु चव्हाण (बहीण)