मुक्तपीठ टीम
ठाणे लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांच्या संरक्षणात कपात करण्यात आली आहे. राजन विचारे यांनी यावरुन संताप व्यक्त केला आहे. या संतापातून राजन विचारेंनी ठाणे पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. पोलिस महासंचलकांना पाठवलेल्या या पत्रात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
पत्रात राजन विचारेंनी स्वत:च्या आणि कुटुंबाच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले…
- मला आणि माझ्या कुटुंबांच्या जीविताला धोका निर्माण झाल्यास मुख्यमंत्री आणि फडणवीस जबाबदार असतील.
- माझ्या पोलीस सरंक्षणात वाढ करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
- सूडबुद्धीने माझ्या संरक्षणात कपात केली आहे.
- त्यामुळे माझ्या कुटुंबीयांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून दुर्दैवाने काही घडले तर त्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जबाबदार असतील, असं या पत्रात राजन विचारे यांनी नमूद केले आहे.
ठाण्यात शिंदेंनी भाजपसोबत सत्ता स्थापनेनंतर शिंदे-ठाकरे गट आमनसामने!
- शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटातील पदाधिकारी आणि नेत्यांना मोठ्या प्रमाणात पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.
- आता ठाण्यातील ठाकरे गटातील खासदार राजन विचारे यांच्या अंगरक्षक आणि पोलीस सुरक्षेमध्ये कपात करण्यात आली आहे. यामुळे विचारे यांनी संताप व्यक्त केला आहे.
- राजन विचारे यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांची भेट घेऊन पत्र व्यवहार केला आहे. कपात केलेले अंगरक्षक पोलिसांची सुरक्षा पुन्हा देण्याची विनंती पत्राद्वारे करण्यात आली आहे.
एकनाथ शिंदें यांच्या नेतृत्वाखालील बंडानंतर माझगाव, कल्याण येथे शिवसैनिकांवर हल्लेही झाले होते. त्यानंतर ठाण्यातील महाप्रबोधन यात्रेनंतर शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील त्यांच्या जीवाला धोका असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता खासदार राजन विचारेंनी त्यांच्याही जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे शिवसैनिक, शिवसेना नेते, पदाधिकारी यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.