मुक्तपीठ टीम
अंधेरी हा शिवसेनेचा बालेकिल्ला. १९९०, १९९५, १९९९ आणि त्यानंतर पुन्हा २०१४ आणि २०१९ अशा निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा अंधेरीत फडकला. भाजपाला एकदाही आपला आमदार निवडून आणता आला नाही. अगदी २०१४मध्ये शिवसेना आणि भाजपा स्वबळावर लढले तरी आणि २०१९मध्य़े शिवसेनेच्या रमेश लटकेंविरोधात युती असूनही भाजपाचे आताचे उमेदवार मुरजी पटेल यांनी बंडखोरी केली तरीही. जिंकली ती शिवसेनाच. तरीही शिवसेनेचा बालेकिल्ला असणारा हा मतदारसंघ मुख्यमंत्री शिंदेंनी भाजपाला का दिला, हा प्रश्न चर्चेत आला आहे.
शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे अंधेरी मतदारसंघाची पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून ऋतुजा रमेश लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर भाजपाकडून आज जोरदार शक्तिप्रदर्शन करून मुरजी पटेलांनी उमेदवारीचा अर्ज दाखल केला. पण याआधी ऋतुजा रमेश लटके यांच्याविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या बाळासाहेबांची शिवसेनेचा उमेदवार मैदानात उतरवण्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. अखेर याबाबत शिंदे आणि भाजपचा निर्णय होत मुरजी पटेलांना भाजपाच्या चिन्हावरून लढण्यास संधी देण्यात आली. मात्र शिंदेंनी शिवसेनेची अंधेरी लढण्याआधीच का गमावली? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुख्यमंत्री शिंदे आणि भाजपा नेते आशिष शेलार यांच्यात गुरुवारी रात्री बैठक पार पडली. या बैठकीत ही जागा भाजपाला सोडण्यावर दोन्ही बाजूने एकमत झालं. त्यानंतर भाजपाच्या मुरजी पटेल यांना कॉल करून कमळ या चिन्हावर निवडणूक लढवण्याच्या सूचना दिल्या. परंतु शिवसेना बालेकिल्ला असणाऱ्या या अंधेरी मतदारसंघाची जागा एकनाथ शिंदे यांच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाने नाव आणि नवीन निवडणूक चिन्ह मिळवूनही भाजपला का सोडली? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शिंदेंनी ही जागा भाजपला का सोडली?
शिवसेनेचा धनुष्यबाण गोठवल्यानंतर शिंदे गटाला ‘ढाल तलवार’ हे नवीन निवडणूक चिन्ह आणि ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असं पक्षाला नाव मिळालं आहे. शिंदे गटासमोर हे चिन्ह कमी वेळेत मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं मोठं आव्हान आहे. तर भाजपाचं कमळ हे घराघरात पोहोचलं आहे, त्यामुळेच भाजपचा उमेदवार निवडण्यात आला. अंधेरी पूर्व मतदारसंघात मराठी मतदारांसोबतच मुस्लिम, मारवाडी, गुजराती, ख्रिश्चन या मतदारसुद्धा आहेत. त्यामुळे शिंदे गटाला कमी कालावधीत त्यांच्यापर्यंत पोहोचणं अधिक आव्हानात्मक ठरलं असतं.
रमेश लटके यांच्या निधनानंतर ठाकरेंनी त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनाच उमेदवारी दिली. त्यामुळे सहानुभूती लटकेंच्या बाजूने आहे. शिंदेंनी ऋतुजा लटके यांना आपल्या गटात ओढण्याचे प्रयत्न केल्याच्या चर्चाही होत्या. परंतु लटकेंच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाल्याने आणि त्यांनी आपण मशाल या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्धार केल्याने शिंदे यांनी माघार घेतली.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. शिंदे गटाचा उमेदवार उतरवल्यास ती थेट शिंदे विरुद्ध ठाकरे लढत झाली असती. सहानुभूतीची लाट ठाकरे आणि लटके यांच्या बाजूने असल्याने शिंदेंना ही निवडणूक जिंकणं अवघड गेलं असतं. तर दुसरीकडे भाजपाच्या मुरजी पटेल यांचा मतदारसंघात चांगला संपर्क असल्याची माहिती आहे. त्यामुळे शिंदे गटाने आपला उमेदवार उतरवण्याऐवजी भाजपलाच आपला उमेदवार उतरवण्यास दिले. त्यामुळे शिंदे यांनी सेफ गेम खेळल्याचं चित्र दिसत आहे. एकूणच कारणं काहीही असली तरी एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांचे विचार आणि त्यांची शिवसेना वाचवण्यासाठी बंडखोरी केल्याचा दावा मात्र आता उघडा पडला आहे. एक प्रकारे लढण्यापूर्वीच अंधेरी गमावलीच, पण बंडखोरीमागील नैतिक मुद्दाही गमावला.