मुक्तपीठ टीम
समाजवादी पक्षाचे संस्थापक ज्येष्ठ नेते मुलायम सिंह यादव यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर त्याच रुग्णालयात बऱ्याच दिवसांपासून उपचार सुरु होते. अखेर या संघर्षशील नेत्याचा मृत्यूशी सुरु असलेला संघर्ष आज सकाळी संपला.
गेल्या काही दिवसांपासून ज्येष्ठ नेते मुलायम सिंह यादव यांची प्रकृती चिंताजनक होते. त्यामुळे त्यांना गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालात दाखल करण्यात आले होते. ते जीवनरक्षक औषधांवर होते. मुलायम सिंह यादव यांना पोटाचा विकार असतानाच त्यांना मूत्रपिंडाचाही त्रास सुरू होता.
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तसंच केंद्रीय मंत्रीपदाचीही जबाबदारी त्यांनी सांभाळली. समाजवाजी विचारांचे पाईक असलेल्या मुलायम सिंहांना देशातील ओबीसी समाजाचा एक प्रमुख चेहरा म्हणून मानलं जात असे. त्यासाठी ते आक्रमकही असत.
कुस्तीपटू आणि शिक्षक असलेल्या मुलायम यांनी दीर्घ राजकीय खेळी खेळली. ते तीन वेळा यूपीचे मुख्यमंत्री होते. केंद्रात संरक्षण मंत्री. ते त्यांच्या धाडसी राजकीय निर्णयांसाठीही ओळखले जातात.
मुलायम सिंह गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात ते व्हेंटिलेटरवर होते. रविवारपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मुलायमसिंह यादव यांच्या निधनानंतर सपा कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे.