सरळस्पष्ट
अखेर जी शक्यता होती तेच घडलं. खरंतर २०जून मध्यरात्रीच्या बंडाची गंभीरता लक्षात आल्यानंतर पुढील काही दिवसातच अशी शक्यता व्यक्त केली जात होती. त्यादृष्टीनं उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शिंदे गट या दोन्ही आघाड्यांवर तयारीही सुरु झाली होती. पण आता निवडणूक आयोगाने प्रत्यक्षात शिवसेना हे मूळ नाव आणि १९८९पासूनचे धनुष्यबाण चिन्ह गोठवलं आहे. शिवसेनेसोबत आणखी काही तरी जोडून नव्या चिन्हासह दोन्ही गटांना मतदारांना सामोरे जावे लागणार आहे. पण सध्यातरी शिंदे गट अंधेरीची जागा शिवसेनेची असली तरी ती लढवण्याच्या तयारीत दिसत नाही. तेथे उद्धव ठाकरेंचीच शिवसेना लढणार आहे. त्यामुळे धनुष्यबाण गोठवला, पण ती मूळ शिवसेना खरंच राजकीय दृष्ट्या गारठणार का हा महत्वाचा मुद्दा आहे.
चिन्हाचं महत्व!
भारतीय राजकारणात चिन्हाचं महत्व खूपच आहे. भारतात मतदारांमध्ये अर्धशिक्षित, अशिक्षित मतदारांचा एक वर्ग आजही असल्यानं स्वाभाविकच त्या वर्गासाठी मतदान यंत्रावरील नाव वाचण्यापेक्षा चिन्ह पाहून बटन दाबणं हा सहज सुलभ पर्याय असतो. तसेच इतर मतदारांच्याही डोक्यात पक्ष म्हणजे अमूक चिन्ह अशी प्रतिमा असतेच. ते बिझनेसमधील एखाद्या ब्रँड लोगोसारखंच. लोगो पाहिला की ब्रँड आठवतो. तसंच. त्यामुळे भारतीय राजकारणात चिन्हाचं एक वेगळं महत्व आहे.
शिवसेनेचं नुकसान
शिवसेना हिंदुत्ववादी असल्यानं शिवसेनेनं १९८९मध्ये धनुष्यबाण चिन्ह मिळवलं. श्रीप्रभू रामांच्या अयोध्येतील जन्मभूमी मंदिराचं आंदोलन सुरु झाला तोच हा काळ. त्याच दरम्यान मिळालेल्या, रामाच्या हातात असणाऱ्या धनु्ष्यबाण चिन्हामुळे शिवसेनेची हिंदुत्ववादी प्रतिमाही अधिकच ठसठशीत झाली. आता पक्षाच्या हिंदुत्ववादी भूमिकेवरूनच बंडखोरी झाली असताना धनुष्यबाण चिन्ह गोठवलं जाणं हे शिवसेनेसाठी नुकसानदायकच आहे.
चिन्ह बदललं, यश गेलं?
भारतीय राजकारणात चिन्हाचं महत्व असलं तरी आजवरचा राजकीय इतिहास पाहिला तर चिन्ह बदललं आणि राजकीय पक्षांचं यशच संपलं, असंही झालेलं दिसत नाही. काही दशकं मागे गेलं तर इंदिरा गांधींनी काँग्रेस फुटीनंतर मिळालेल्या वेगळ्या चिन्हांवरही यश मिळवलं. शरद पवार यांनीही काँग्रेसमधून समाजवादी काँग्रेस आणि १९९९मध्ये काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेस असा नवा प्रवास सुरु केला तरी निवडणूक यशापासून ते काही दुरावले नाहीत.
महाराष्ट्रातील दोन व्यक्तिगत उदाहरणंही आहेत.
सध्या शिंदे गटासोबत असलेले दादा भुसे यांनी एकदा मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला गेल्यावर बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. तेव्हा कमी कालावधीत त्यांचं नवं चिन्ह शिवसैनिकांनी घरोघरी पोहचवून दादांना विधानसभेत पोहचवलं होतं. (तेव्हा बहुधा दादांना भाजपा हिंदुत्ववादी वाटत नसावी!)
दुसरं उदाहरण राणांचं. अमरावतीच्या. २०१९मध्ये नवनित राणा लोकसभेला अपक्ष उभ्या राहिल्या. त्यांच्ायविरोधातील शिवसेना उमेदवार आनंद अडसुळ यांनी एका छोट्या पक्षाच्या उमेदवाराकडून त्यांचं लोकप्रिय चिन्ह आधीच मिळवलं. नोंदणीकृत पक्षांना चिन्ह वाटपात प्राधान्य असल्यानं ती रणनीती त्यांनी वापरली. नवनीत राणांनी त्यावेळी पाना चिन्ह घेतलं. त्यांचं जुनं चिन्ह गेल्याच्या चर्चेबरोबरच त्यांना नवं कोणतं चिन्ह मिळालं या उत्सुकतेतून त्यांचा पाना घरोघरी पोहचला. त्या अडसुळांना पाणी पाजत विजयी झाल्या. तोच पाना चिन्ह असलेल्या पक्षाची भेट आमदार रवी राणांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ऑफर केली आहे! शिवसेना ब्रँड नेमचं महत्व माहित असलेले शिंदे अशी ऑफर स्वीकारणार कशी, पण किमान अमरावतीच्या स्थानिक राजकारणात बच्चू कडूंना चेकमेट देण्यासाठी ही ऑफर कामी येऊ शकेल.
असो, हे थोडं विषयांतरही झालं. पण हे महाराष्ट्रापुरतंच मर्यादित नाही. आंध्रात जगन मोहन यांनाही हा त्रास झाला. ते यशस्वीही होत राहिले. त्यामुळे चिन्ह गेलं म्हणजे सर्वच संपलं असं नसतं.
शिवसेना म्हणजे धनुष्यबाण तसंच ठाकरेही!
मुळात अनेक राजकीय नेत्यांच्या मते चिन्हापेक्षाही जास्त महत्व हे पक्षाच्या नेतृ्त्वाला असते. शिवसेना म्हटलं की सामान्य माणसांना ठाकरेच आठवतात. त्यातही पुन्हा बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबातीलच उद्धव, आदित्य आठवतात. त्यामुळे राज यांच्या नावातही ठाकरे असूनही तसं यश एका निवडणुकीतील मर्यादेपलिकडे मिळू शकले नाही. त्यामुळे शिवसेनेच्या नव्या नावासोबत ठाकरे मिळो न मिळो, सामान्य माणसांसाठी, शिवसैनिकांसाठी ठाकरे नेतृत्व करत असलेली शिवसेना हीच शिवसेना असणार असल्याचं मत राजकीय नेते व्यक्त करतात, ते उगाच नाही.
चिन्ह गोठलं, शिवसेना गारठणार नाही!
सर्वात महत्वाचा मुद्दा हा मराठी मानसिकतेचा. मराठी मानसिकता ही आक्रमक आहे. ती इतिहासकाळापासून दिल्लीच्या सल्तनतीविरोधातील कायमच राहिली आहे. अगदी पंडित नेहरू लोकप्रियतेच्या हिमालयावर असतानाही याच महाराष्ट्रानं त्यांना काळे झेंडे दाखवले होते. आताही शिवसेना या मराठी अस्मितेची भूमिका मांडणाऱ्या हिंदुत्ववादी पक्षाच्या बाबतीत घडणाऱ्या घडामोडी सामान्य मराठी माणसांपैकी बहुसंख्यांना अस्वस्थ करणाऱ्या आहेत. शिवसेनेला उगाचंच त्रास दिला जात आहे, असं सामान्य मराठी माणसांना वाटत असल्याच्या भावना जाणवत आहेत. त्यात पुन्हा अगदी शिंदेंच्या प्रभाव क्षेत्राचा कानोसा घेतला तरी साहेबांनी बंड करून मुख्यमंत्रीपद मिळवलं, तोपर्यंत चाललं, पण आता थेट साहेबांच्या पक्षावरच त्यांनी दावा सांगणं मात्र खटकणारं असल्याचं मत अनेकांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी चिन्ह गमावणं ही बंडानंतरची आपत्ती नाही तर आक्रमकतेनं सळसळायला लावणारी इष्टापती ठरली तर आश्चर्य वाटायला नको! नवं चिन्ह नव्या शिवसेनेचा नव्या यशोमार्गावरील प्रवास सुरु करुन देणारी ठरू शकते!!