मुक्तपीठ टीम
समाज आणि समुदायांच्या उन्नतीसाठी एस्सार फाउंडेशन नेहमीच आघाडीवर असते. ‘स्वच्छ भारत अभियाना’च्या समर्थनार्थ, एस्सार फाउंडेशन आणि एस्सार पोर्ट्सने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या डी वॉर्डला वॉटर फिल्टर दान केले आहे. या वॉटर फिल्टर्समुळे सुमारे २,००० स्वच्छता कामगारांना (सफाई कर्मचारी) स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात मदत होईल.
स्वच्छतेचे काम, कचरा गोळा करणे, रस्ते, गटारे आणि सांडपाणी इत्यादी साफ करणे हे काम करणारे सफाई कर्मचारी परिसंस्थेतील मुख्य घटक आहेत. जरी त्यांचे कार्य सर्व नागरिकांसाठी स्वच्छ वातावरणाची खात्री देत असले तरी त्यांना मात्र अत्यंत आव्हानात्मक वातावरणाचा सामना करावा लागतो. स्वतःसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी अनेक आरोग्य विषयक समस्यांची जोखीम पत्करावी लागते.
समूह कंपन्यांच्या पाठिंब्यासह एस्सार फाऊंडेशनतर्फे समाजातील सर्वात असुरक्षित आणि वंचित घटकांच्या आरोग्य आणि स्वच्छतेकडे लक्ष केंद्रित करणारे उपक्रम हाती घेण्याचा नेहमीच प्रयत्न केला जातो. ‘एस्सार केअर्स’ उपक्रमांतर्गत दिलेली ही देणगी म्हणजे सफाई कर्मचारी आपल्या समाजासाठी करत असलेल्या महत्त्वपूर्ण कार्याची आणि त्यामुळे स्वच्छतेसाठी राष्ट्राच्या दृष्टीकोनावर पडत असलेल्या प्रभावाची पावती होती.